Search
Close this search box.

दिल्ली ते डेहराडून हा सहा तासांचा प्रवास होणार अडीच तासांंत – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नवी दिल्ली, दि. ६ एप्रिल – “दिल्ली ते डेहराडून कॉरिडॉर दिल्लीतील अक्षरधाम मंदिराजवळील डीईएमपासून सुरू होतो. संपूर्ण प्रकल्प कॉरिडॉर ‘इपीसी’ मोडवर कार्यान्वित होत आहे. कॉरिडॉरची एकूण लांबी सुमारे २१३ किमी ६ लेन असणार आहे. सध्या या प्रवासासाठी ६ तास लागतात. मात्र, हा मार्ग वापरात आल्यानंतर दिल्ली ते डेहराडून प्रवास दोन ते अडीच तासांत शक्य होणार आहे. याशिवाय, दिल्ली-डेहराडून-सहारनपूर इकॉनॉमिक कॉरिडॉर विकासामुळे या परिसरातील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. विशेष करून उत्तराखंडच्या पर्यटन उद्योगाला यामुळे मोठा फायदा होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

दिल्ली ते डेहराडून या सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी गुरुवारी (दि. ६ एप्रिल) श्री गडकरीजी यांनी केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जनरल श्री व्ही.के. सिंह जी, खासदार डॉ. श्री सत्यपाल सिंह जी, खासदार श्री मनोज तिवारी जी, उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री जितिन प्रसाद जी, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री रामवीर सिंह बिधुरी जी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “दिल्लीतील प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. जगात सर्वांत प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा समावेश होते. या प्रदूषणाचे मुख्य कारण जीवाश्म इंधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर हे आहे. याशिवाय, वाहतुकीच्या समस्यांशीही नागरिकांना दररोज झगडावे लागते. त्यामुळे डिसेंबर-२०२४ पूर्वी दिल्ली आणि आजूबाजूच्या भागांतील ५० टक्के प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने दिल्ली आणि आजूबाजूच्या भागांत ६५ हजार करोड रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहे. ‘अर्बन एक्सटेंशन रोड’ हा मार्ग दिल्लीची लाईफलाईन ठरणार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, कश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना हा रस्ता कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. याशिवाय, द्वारका एक्सप्रेस वे, डीएनडी इंटरचेंज, दिल्ली ते पानिपत, गुना ते सोनीपत आदी रस्त्यांचे कामदेखील दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात वेगाने सुरू आहेत. दिल्ली ते डेहराडून कॉरिडॉरमध्ये ५ आरओबी, ११० वाहने अंडर पास, सर्व्हिस रोड, १६ प्रवेश/एक्झिट पॉइंट्स असणार आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांतर्गत प्रवास वेगात होणार असल्याने नागरिक हवाई वाहतुकीपेक्षा या मार्गाने प्रवास करण्यास प्राधान्य देतील. दिल्ली ते डेहराडून कॉरिडॉर चार विभागांमध्ये विभागण्यात आला आहे. अक्षरधाम ते ईपीई जंक्शन आणि सहारनपूर बायपास ते गणेशपूर हे दोन पॅकेजेसमध्ये, तसेच ईपीई जंक्शन ते सहारनपूर बायपास चार व गणेशपूर ते डेहराडून तीन पॅकेजेसमध्ये तयार करण्यात येत आहे.”

आशियातील सर्वांत लांब वन्यजीव कॉरिडॉर

दिल्ली ते डेहराडून ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे या मार्गाच्या दुतर्फा झाडी, बर्ड पार्क तसेच या मार्गावरील उड्डाणपूलांवर ‘चित्रकला’ विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विविध चित्रे रेखाटून घेतल्यास या मार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. याशिवाय, गणेशपूर ते डेहराडून या २० किमीचा शेवटचा टप्पा वन्यजीव संरक्षित भागातून जात असल्याने येथे १२ किमी लांबीचा आशियातील सर्वांत लांब वन्यजीव कॉरिडॉर आणि ३४० मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तसेच अपघातानंतर जखमींना वेळेत उपचार मिळावे, यासाठी हेलिकॉप्टरद्वारे रुग्णांची वाहतूक होण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध होणार आहे. रोजगाराच्या दृष्टीने महामार्गाच्या आसपास फळ-भाजी, हॅन्डमेड वस्तूंचे मार्केट उभारण्यात येणार आहे. ज्यामुळे परिसराचा वेगात विकास होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article