Search
Close this search box.

विज्ञान, तंत्रज्ञानाद्वारे साध्य होणारा शाश्वत विकासच खरे रामराज्य – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नवी दिल्ली, दि. ७ एप्रिल – “प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भगवान श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. अयोध्येत राम मंदिर होण्यासाठीच्या संघर्षात अनेक रामभक्तांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे हे योगदान कायम सर्वांच्या स्मरणात राहणारे आहे. संस्कार, इतिहास, संस्कृती, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, अध्यात्म आणि विरासत हे जोपासण्यासोबतच विज्ञान तसेच तंत्रज्ञानाद्वारे शाश्वत विकासदेखील आवश्यक आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन सर्वसामान्यांची आर्थिकस्थिती सुधारण्यासोबतच त्यांच्या जीवनपद्धतीत बदल होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट येथे आयोजित कार्यक्रमात ‘अयोध्या पर्व’च्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘सीता रसोई’चे उद्घाटन आणि ‘अहो अयोध्या’ व ‘शब्द में अयोध्या’ या पुस्तकांचेदेखील प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी महंत श्री कमल नयन दास, खासदार श्री लल्लू सिंह, खासदार सौ. दर्शना सिंह, श्री सतीश शर्मा, श्री राम बहादूर राय यांच्यासह इतर मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “मागील अनेक वर्षे धार्मिकस्थळांवरील पायाभूत सुविधांचा विकास होऊ शकला नाही. खराब रस्ते, मूलभूत सुविधादेखील उपलब्ध नसल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. मात्र, आज जवळपास १ लाख कोटी रुपयांचा खर्च धार्मिकस्थळांवरील पायाभूत सुविधा विकासावर करण्यात येत आहे. याशिवाय, अयोध्येतील रस्त्यांच्या विकासासाठी २५ ते ३० हजार करोड रुपये खर्च करण्यात येत आहेत. राम गमन मार्ग, माता सीता यांचे जन्मस्थान असलेल्या जनकपूरीपर्यंतचा मार्ग, राम जानकी मार्ग, आयोध्या रिंगरोड, अंतर्गत रस्ते तसेच लखनऊ ते आयोध्या या मार्गांमुळे भाविकांचा प्रवास सुखद होणार आहे. याशिवाय, विमानतळ व रेल्वे स्थानक यांचाही विकास होत आहे. प्रभू रामचंद्र आणि रामराज्य यांचासंबंध मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीशी आहे. तसेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या सुखी, समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली समाज याच्याशीदेखील आहे. त्याचसोबत गरिबी, भूकमरी, जातीयवाद, सांप्रदायिक वाद यापासून मुक्त समाज याच्याशीही आहे. साऱ्या विश्वासाठी आदर्श ठरेल अशी आर्थिक, सामाजिक समानता असेल तेव्हाच रामराज्य निर्माण होईल. समृद्ध रामराज्यासाठी आधुनिकीरणाला जीवनाचा भाग बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी भविष्यातील तंत्रज्ञान निर्माण होणे आवश्यक आहे. इथेनॉल, इलेक्ट्रिक वाहन हेच भविष्य आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अयोध्येचा विकास झाल्यास देश विदेशातून पर्यटक येऊन रोजगार उपलब्ध होऊन गरीबी दूर होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article