Search
Close this search box.

१९४७ नंतर राज्यकर्त्यांनी सावरकरांबद्दल अनेक गैरसमज पसरवले – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. ४ एप्रिल – “देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यासाठी सावरकरांनी बलिदान दिले; पण १९४७ सालानंतरच्या राज्यकर्त्यांनी हिंदुत्त्व आणि सावरकरांबद्दल अनेक गैरसमज पसरवले, हे आपले दुर्भाग्य म्हणावे लागेल. हिंदुत्त्व हेच भारतीयत्त्व आहे आणि भारतीयत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व आहे, हा विचार सावरकरांनी समाजाला दिला. ते कधीच कोणत्या धर्माच्या विरुद्ध नव्हते. उपासना पद्धती वेगळी असली, तरी राष्ट्रीय आधारावर आपण सर्व भारतीयच आहोत. हिंदू संस्कृती संकुचित नाही. हिंदुत्त्व हे जीवन जगण्याचे मर्म आहे. व्यक्ती नव्हे, राज्य आणि सरकार धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. सेक्युलॅरिझम म्हणजे धर्मनिरपेक्ष असा अर्थ होत नाही, तर त्याचा अर्थ ‘पंथ निरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव’ असा आहे. सर्व धर्माबरोबर सामान न्याय, सामाजिक आणि आर्थिक समता हेच भारतीयत्त्व आणि राष्ट्रीयत्त्व आहे, हे हिंदुत्त्वाच्या रूपाने सावरकरांनी सांगितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नागपूर येथील शंकर नगर चौक येथे मंगळवारी (दि. ४ एप्रिल) आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्री सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवर, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “एका कुटुंबाने स्वातंत्र्य आणि देशाकरिता किती त्याग, बलिदान दिले ते ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक वाचल्यानंतरच समजून येते. पुस्तक वाचत असताना डोळ्यातून आपसूकच अश्रू येतात. अंदमानच्या जेलमध्ये असताना त्यांनी किती यातना भोगल्या, ते तिथे गेल्यानंतरच समजते. स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांच्या हृदयात, मनामनात आहेत. हा स्वातंत्र्याचा इतिहास अत्तराच्या सुगंधात व गुलाबाच्या पाण्याने लिहिला गेला नाही,तर रक्ताच्या थारोळ्यातून लिहला गेला आहे. त्यामुळे तो कोणीही मिटवू शकणार नाही.”

“आज आम्ही ज्या स्वाधीन भारताचे नागरिक आहोत, त्याचे श्रेय अनेक देशभक्तांना, स्वातंत्र्यवीरांना आणि क्रांतीकारकांना आहे. स्वातंत्र्य कसे मिळवावे, यात मतभिन्नता होती. सत्य आणि अहिंसेच्या आधारे आपण स्वातंत्र्य मिळवू, असे महात्मा गांधीजींचे विचार होते. मात्र, शाहिद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार भिन्न होते. त्यांच्यानुसार इंग्रजांशी युद्ध करून त्यांना देशातून हाकलून दिल्यानंतरच खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य मिळणार होते. या स्वातंत्र्य लढ्यात मार्ग भिन्न असले तरी उद्दिष्ट मात्र एकच होते. माणूस हा जातीने नव्हे, गुणाने मोठा होत असतो, असा समाज सुधारणेबाबतचा विद्रोही विचार स्वातंत्रवीर सावरकरांनी मांडला. अंधश्रद्धा, सामाजिक रूढी-परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी वेळोवेळी समाजप्रबोधन केले. एक समाजसुधारक, स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बलदंड सत्तेच्या विरुद्ध लढणारा स्वातंत्र्यवीर आणि एक उत्तम साहित्यिक व कवी म्हणून त्यांना आपण कधी विसरू शकत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article