आपला देश ऊर्जा निर्यात करणारा देश बनेल – केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी

नागपूर, २५ नोव्हेंबर – “पेट्रोल- डीझेलमुक्त भारत हा आपला संकल्प आहे आणि त्या दृष्टीने वाटचालही सुरु झाली आहे. या संकल्पपूर्तीसाठी जनसामान्यांसोबतच शेतकऱ्यांची साथही आवश्यक आहे. आपला शेतकरी अन्नदातासोबतच ऊर्जादाता झाला पाहिजे. असे झाल्यास देश ऊर्जा आयात करणारा न राहता निर्यात करणारा बनेल,” असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या पुढाकारातून नागपूर येथील पंजाबराव कृषी विद्यापीठ ग्राउंड, दाभा येथे आयोजित ‘ॲग्रोव्हिजन – २०२२’ या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराजसिंह चौहान जी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी बोलत होते. याप्रसंगी  खासदार श्री कृपाल तुमाने जी, खासदार श्री रामदास तडस जी, आमदार श्री समीर मेघे जी, आमदार श्री प्रवीण दटके, आमदार श्री ना. गो. गाणार जी, श्री पंकज भोयर, डॉ. आशिष पातुरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. श्री शरद गडाख, स्टेट बँकेचे चीफ जनरल मॅनेजर आणि ॲग्री बिझनेस युनिट व गव्हर्नमेंट स्कीमचे रिजनल हेड श्री शंतनू पेंडसे जी आणि श्री शंतनू गुप्ता जी आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “आज आपला १६ लाख करोड रुपये खर्च एकट्या इंधनाच्या आयातीवर होतो. मात्र, देशातच जैविक इंधन तयार झाल्यास तो वाचण्यासह पर्यावरण रक्षणही होईल. अन्न, चारा आणि इंधन ही ॲग्रोव्हिजनची संकल्पना आहे. या तीन शब्दातच आपले उद्दिष्ट समाविष्ट आहे.”

“तांदळाच्या शेतातातील ‘परली’पासून प्रतिदिन १ लाख लिटर इथेनॉल आणि १५० टन बायोबिटुमीन तयार करणारा प्रकल्प इंडियन ऑइलने पानिपत येथे सुरु केला. यामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या तांदूळ उत्पादक क्षेत्रात ‘परली’पासून बायोबिटुमीन आणि इथेनॉल तयार होणार आहे. असे प्रकल्प देशभर सुरु झाल्यास आपल्याला बायोबिटुमीन आयात करण्याची गरज भासणार नाही. आसाम येथे बांबूपासून बायो इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्पही सुरू झाला आहे. त्यामुळे आता पडीक जमीनवर बांबू लागवड होणार असून या बांबूपासून बायो इथेनॉल तयार होणार आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, “देशात सर्वत्र लवकरच इथेनॉल पंप सुरु करण्याचा मानस आहे. त्यानुसार प्रमुख दुचाकी उत्पादक कंपन्यांना फ्लेक्स इंजिन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे आता गाड्या या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो इथेनॉलवर चालतील, याचा मला आनंद आहे. दरम्यान, लवकरच १५ वर्षे जुन्या गाड्या स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. त्यानुसार आदेशही काढण्यात आले आहेत. त्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन स्क्रॅपिंग युनिट शासनाकडून सुरु कसरण्यात येणार आहेत. ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह प्रदूषणही थांबेल.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “देशातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ॲग्रोकन्व्हेन्शन सेंटर स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या नावाने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असून यासाठी लागणाऱ्या १५० कोटींच्या निधीची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, ती देखील लवकरच पूर्ण होईल. मला विश्वास आहे की, पुढील वर्षीच्या ‘ॲग्रोव्हिजन’ पूर्वी या ॲग्रोकन्व्हेन्शनच्या कार्याचा शुभारंभ होईल. यासाठी वर्धा रोड परिसरातील साडेचार हजार स्क्वेअर फुटाची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचे भूमिपूजन पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. या एसी सभागृहात ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेता येणार आहे. तसेच इतरही विषयांवर वर्षभर त्यांना तज्ज्ञांचे नि:शुल्क मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय, याच परिसरात बाजारही सुरु करण्यात येणार असून जेथे ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून जास्त करून ऑरगॅनिक फळ, भाज्या आणि धान्य खरेदी करू शकणार आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *