छत्रपती शाहू महाराज करियर शिबिरात युवकांशी संवाद
नागपूर, ३ जून : आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य आणि ज्ञान आत्मसात करून त्यात निपुणता प्राप्त करा. या कौशल्याला त्याला कल्पना आणि ‘व्हिजन’ची जोड मिळाली तर स्वयंरोजगाराचा मार्ग सहज खुला होऊ शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने वाठोडा येथील सिम्बॉयसीस संस्थेच्या सभागृहात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घान केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, सिम्बॉयसीस सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. जयप्रकाश पालिवाल, व्यवसाय शिक्षण विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. नितीन गडकरी यांनी तरुणांसोबत संवाद साधताना स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकसित करण्याचा सल्ला दिला. ‘नोकरी करा किंवा स्वयंरोजगाराचा मार्ग निवडा, दोन्हींसाठी कौशल्य आवश्यक आहे. शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न कराल तर नुकसान होईल. स्वयंरोजगार तर केवळ उत्तम कौशल्याच्या आधारावरच कमावता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य विकसित करा आणि त्यामध्ये स्पेशलायझेशन मिळवा,’ असे आवाहन ना. गडकरी यांनी केले. यासाठी त्यांनी मेंदी काढण्याचा विक्रम रचणाऱ्या सुनिता धोटे, ऑर्गॅनिक कॉटन तयार करणाऱ्या वर्धेतील विभा गुप्ता यांची उदाहरणे मुलांना दिली. प्रिती झिंटा, ऐश्वर्या रॉय, जया बच्चन, हेमा मालिनी या दिग्गज नटींना ऑर्गॅनिक कॉटनपासून तयार करण्यात आलेली साडी भेट दिल्याचेही ते म्हणाले.
मन लावल्याशिवाय यश नाही
कोणत्याही कामात मन लावल्याशिवाय कुठलीही नवीन गोष्ट शिकता येत नाही आणि नवीन प्रयोगही करता येत नाही. त्यामुळे ज्ञानाचे रुपांतर रोजगारात करण्यासाठी स्वतःला झोकून द्या, असे आवाहन करतानाच आपल्या कामात गुणवत्ता, प्रामाणिकता आणि विश्वासार्हता जपण्याचा सल्लाही ना. नितीन गडकरी यांनी दिली.