केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रस्तावावर चर्चा
नागपूर – नागपूरकरांच्या सोयीकरिता दळणवळणाची सगळी साधने एका ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) विकसित करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. रवीभवन येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात आवश्यक असलेली संबंधित विभागांची परवानगी आणि पुढील कार्यवाही करण्याची सूचना ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली.
जगातील अद्ययावत प्रकारच्या अशा पायाभूत सुविधांच्या धर्तीवर अजनी येथील एमएमएलपीचे डिझाईन तयार करावे, असेही ना. गडकरी यांनी सूचविले. रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाणारी गर्दी भुयारी मार्गाने वळविणे शक्य आहे. तसेच याठिकाणी किरकोळ विक्रेत्यांची बाजारपेठ उभी करता येईल आणि पार्किंगचीही उत्तम अशी व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी सूचविले. अजनी येथे फूड कॉर्पोरेशन आफ इंडिया, मध्यवर्ती कारागृह, सिंचन कॉलनी, रेल्वे व मेडिकलचे क्वार्टर्स तसेच आसपासच्या परिसरातील जागेवर एमएमएलपी प्रस्तावित केले आहे. यासाठी फूड कॉर्पोरेशनचे कार्यालय व गोडाऊन इतरत्र हलविता येईल का, याची शक्यता तपासून बघण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांशी समन्वय साधून प्रस्ताव तयार करावा, असे ना. गडकरी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी चर्चेला आलेल्या विषयांच्या अनुषंगाने एमएमएलपीचा प्राथमिक प्रकल्प अहवाल पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. या प्रकल्पासाठी राज्य सरकार व एनएचएआयचा सामंजस्य करार करावा लागेल. त्यादृष्टीने औपचारिकता पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याची प्रक्रिया ठरविण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले.
दाभ्यात एग्रो कन्व्हेन्शन सेंटर
नागपूर हे भारतातील सर्व प्रकारच्या प्रदर्शनांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी प्रथम पसंतीचे केंद्र होईल, या दृष्टीने दाभ्यात डॉ. पंजाबराव देशमुख एग्रो कन्व्हेन्शन सेंटर विकसित करता येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. राज्य सरकारच्या अख्त्यारीत या केंद्राचे निर्माण होणार आहे. हे केंद्र शंभर टक्के सौरऊर्जेवर चालणारे असावे, याठिकाणी कृषी प्रदर्शन व प्रशिक्षणांसोबत इतरही क्षेत्रातील प्रदर्शनांचे आयोजन होऊ शकेल, या दृष्टीने नियोजन करावे. याठिकाणी असणारी राहण्याची व्यवस्था तारांकित हॉटेलमधील खोल्यांसारखी असावी, जेणेकरून कार्यक्रम नसताना त्याचा वाणिज्यिक उपयोग होऊ शकेल. तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याची शक्यताही तपासून बघावी, असेही ना. गडकरी यांनी सूचविले. नागपूर शहराला लागून असलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांसाठी उपयोगात यावी, या उद्देशाने या केंद्राचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याठिकाणी प्रदर्शनांसाठी तीन भव्य सभागृह, १५०० क्षमतेचे सभागृह, संवाद कक्ष, २५० क्षमतेचा सेमिनार हॉल, २०० क्षमतेचे गेस्ट हाऊस, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत, फूड कोर्ट आदी गोष्टी प्रस्तावित आहेत. नव्या पिढीला कृषी क्षेत्राशी संबधित ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करता यावे, असाही या केंद्राचा उद्देश असणार आहे.
अंभोऱ्याचा होणार कायापालट
भंडारा मार्गावरील श्रीक्षेत्र अंभोरा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रस्तावावरही केंद्रीय मंत्री गडकरी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना पर्यटनाचा अनुभव मिळावा, यादृष्टीने मंदिर परिसरासोबतच उद्यान, सुसज्ज असा खुला रंगमंच, अस्थी विसर्जनाची व्यवस्था आदी गोष्टी प्रस्तावित आहेत. अंभोरा येथील केबल पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणाचे महत्त्व व सौंदर्य वाढलेले आहे. ना. गडकरी व ना. फडणवीस यांनी वैनगंगेवरील केबल पुलाच्या दोन्ही बाजूंना पर्यटनाचे केंद्र विकसित करण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा परिसर जल पर्यटनाचे केंद्र म्हणून नावारुपाला आणण्याच्या दृष्टीने विचार करण्याच्या सूचनाही ना. गडकरी यांनी दिल्या. धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याठिकाणी मंदिर परिसरात शिव मंदिरासह चांद शाह वली दर्गा, बुद्ध विहार यांचेही सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. तर धार्मिक पर्यटनासाठी गोसेखुर्दच्या बॅकवॉटरचा उपयोग करून हाऊसबोट, रिसॉर्ट, वॉटरस्पोर्ट्स आदी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.