Search
Close this search box.

शहरातील प्रत्येक घरी लागावे कडुलिंबाचे झाड

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : ग्रीन फाऊंडेशनला पाण्याचा टँकर

नागपूर – शहरातील हिरवळ वाढविण्याच्या व शहराला प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या घरी एक कडुलिंबाचे आणि संत्र्याचे झाड लावावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) केले. ग्रीन फाउंडेशनला आज सीएनजीवर चालणारा पाण्याचा टँकर श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला ग्रीन फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे, सचिव एड. निशांत गांधी, फाउंडेशनचे सदस्य वसंत म्हैसाळकर, दिलीप चिंचमलातपुरे, कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील झाडांना आणि खेळाच्या मैदानांना नियमीत पाणी मिळावे, या उद्देशाने ग्रीन फाउंडेशनला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रीन फाउंडेशनची स्थापना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, सौंदर्यीकरण व्हावे तसेच नागपूर शहर प्रदूषणमुक्त व्हावे, या उद्देश्याने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ग्रीन फाउंडेशनने २०२२ मध्ये विविध समाजसेवी, सरकारी, निमसरकारी तसेच औद्योगिक संस्थांच्या सहकार्याने शहरात ६ हजार रोपट्यांची लागवड केली आहे. प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नागपूर मेट्रो, नागपूर महानगरपालिका व जयस्वाल निको समूह, मल कन्स्ट्रक्शन्स, दत्ता मेघे फाउंडेशन, एसएमएस, मॉयल, रायसोनी ग्रुप आफ इन्स्टीट्यूशन्स आदींनी वृक्षारोपण व सौंदर्यीकरणात सहभाग नोंदवला. याशिवाय सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून फाउंडेशनने रामगिरी मार्गावर ‘वॉकर्स पॅराडाईज’ची निर्मिती केली. तर अवयवदानाच्या संदर्भातील जनजागृतीचा भाग म्हणून अजनी मेट्रो स्टेशनच्या खालच्या भागाला ‘अंगदाता स्मारक’ उभारले.

झाडांना प्रक्रियायुक्त पाणी

ग्रीन फाउंडेशनच्या वतीने शहरातील झाडांना आणि मैदानांना सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी सीएनजी टँकरद्वारे देण्यात यावे, अश्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिल्या. वृक्षारोपणानंतर वृक्षसंवर्धनामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये व निरंतर पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने या सूचना देण्यात आल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article