नागपूर, ५ मे : नागपूर येथील ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल (OFROT) च्या भव्य वास्तूचे आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी विभागातील ट्रायबल कमिश्नर श्री रवींद्र ठाकरे, OFROT चे अध्यक्ष अॅड. राजेंद्र मरसकोल्हे, OFROT चे सचिव नंदकिशोर कोडापे, अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी समाजाबद्दल प्रेमाची व विकासाची भावना मनात ठेवून काम करणाऱ्या अॅड. मरसकोल्हे यांचे या वेळी श्री गडकरीजींनी अभिनंदन केले. त्यांच्या प्रयत्नातून या OFROT ची भव्य इमारत तयार झाली असे मत त्यांनी व्यक्त केले. तळागाळातील शोषित, पीडितांचा विकास झाला पाहिजे, हे सांगून त्यांनी आमटे परिवार, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. सातव अशा समाजाच्या प्रगतीचा विचार करून काम करणाऱ्यांचा उल्लेख केला व त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
“लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, वर्धा, अमरावती, मेळघाट या भागांतील आदिवासी भागांतील मुलांसाठी १८०० शाळा (एकल विद्यालय) चालवल्या जातात. या शाळांमध्ये १००० आदिवासी शिक्षक नेमले आहेत. आज या शाळांमध्ये १८००० विद्यार्थी शिकत आहेत. तसेच आदिवासी वसतीगृह बांधून मुलांना निःशुल्क शिक्षणाची सोय करून देण्यात आली आहे. आदिवासी मुलांना छोट्या कोर्सच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून देण्यात आला, तसेच प्रत्येक स्तरावर आदिवासींचा विकास केला, तरच समाजाचा विकास होईल”, असे प्रतिपादन या वेळी श्री गडकरीजी यांनी केले.

“सामाजिक, राजकीय, आर्थिक स्तरांवर समाजाचा विकास किती झाला, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती त्याच्या जातीमुळे, धर्मामुळे, पंथामुळे मोठी होत नाही. तिचा मोठेपणा त्या व्यक्तीच्या गुणांवर अवलंबून असतो. त्यामुळे समाजात शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसाराप्रमाणेच मूल्याधिष्ठित बदल होणेही आवश्यक आहे. समाजाची सर्वांगीण प्रगती करायची असेल, तर आदिवासी समाजातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी चांगले घर, शुद्ध पाणी, चोविस तास वीज, अत्याधुनिक रुग्णालय आणि गावात चांगले रस्ते आवश्यक आहेत. ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’च्या माध्यमातून सर्वदूर चांगले रस्ते बांधता आले याचे समाधान आहे”, असे मत या वेळी श्री गडकरीजी यांनी व्यक्त केले.
