प्रोत्साहन व विक्रीची हमी मिळाल्यास बांबूची उत्पादन वाढ शक्य : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

स्टीलऐवजी पर्यावरणपूरक बांबू क्रॅश बॅरियर्सला प्रोत्साहन दिल्याबद्दल श्री गडकरीजी यांचा सत्कार

नागपूर, दि. १६ एप्रिल – “बांबूवर प्रक्रिया करून अनेक बहुउपयोगी वस्तूंची आज मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे. मात्र, त्यातुलनेत मार्केट उपलब्ध नसल्याने त्याला मागणी कमी आहे. जोपर्यंत याविषयी माहिती होऊन ते बाजारात सर्वांना सहज उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत या क्षेत्राला चांगले दिवस येणार नाहीत. या उत्पादनांना बाजार उपलब्ध होण्यासाठी गरजेवर आधारित संशोधन, मालाची गुणवत्ता, सिद्ध तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि तयार उत्पादनांची विक्री योग्यता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बांबूचे उत्पादन ही आपल्यासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. उत्पादनाला प्रोत्साहन आणि मालाच्या विक्रीची हमी उत्पादकांना मिळण्यास हे शक्य आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ औद्योगिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नागपूर येथील ‘बांबू सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे केंद्रीय मंत्री श्री गडकरीजी यांच्यासमवेत औद्योगिक कृषी उद्योजक आणि भव्य सृष्टी उद्योगाचे सीएमडी श्री गणेश वर्मा जी आणि निरी संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लाल सिंह जी यांचा सत्कार करण्यात आला. भारताच्या रस्त्यांच्या जाळ्यात स्टीलऐवजी पर्यावरणपूरक बांबू क्रॅश बॅरियर्सच्या अंमलबजावणीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्री गडकरीजींना हा सन्मान प्रदान करण्यात आला. निरी सभागृह येथे रविवारी (दि. १६ एप्रिल) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री गिरीशभाऊ, डॉ. श्री बेडेकर, श्री अजय पाटील, श्री सुनील जोशी, बांबू विकास महामंडळ संचालक श्री श्रीनिवास राव यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “आसाममध्ये बांबूपासून २ लाख लिटर बायोइथेनॉल तयार करण्यात येत आहे. बेंगळुरूमधील नवीन विमानतळाच्या बांधकामातदेखील बांबूचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, देशातील महामार्गांवर सुरक्षेसाठी बांबूपासून बनवलेल्या क्रॅश बॅरियरचा वापर होत आहे. स्टीलऐवजी बांबू क्रॅश बॅरियरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढवण्यासाठी त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक बांबूचे उत्पादन गरजेचे आहे. तसेच त्यात सुरक्षेच्या दृष्टीने आणखी काम होण्याची आवश्यकता आहे. चांगल्या गुणवतेच्या क्रॅश बॅरियरच्या निर्मितीसाठी उत्पादकांनी पुढाकार आवश्यक आहे. बांबूच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी पडीक जमिनीवर त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. नागपूर मेट्रो मार्ग आणि उड्डाणपुलाच्या बीम कस्टमध्ये फायबर स्टीलचा वापर केल्याने दोन पिलरमधील अंतर वाढले आहे. यापुढे जाऊन बांबूवर संशोधन होऊन फायबर स्टीलच्या गुणवत्तेचे आणि तेवढेच मजबूत फायबर बांबू तयार करून वापर केल्यास फायदेशीर ठरणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *