नागपूर, दि. १४ एप्रिल – नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे परिसराचा विकास होणार आहे. या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढणे, पादचारी मार्ग तयार करणे, मलवाहिनी टाकणे, तलाव किनार भिंत बांधणे यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या दृष्टीने चांगली झाडी, लाईट अशा अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्यामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प शहर विकासाचे नवे द्योतक ठरेल. मात्र, तलावाचे सौंदर्य टिकवण्याची आणि तलावातील पाणी शुद्ध व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागपूरकर म्हणून आपल्या प्रत्येकाची आहे. यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले. यावेळी त्यांनी तांडापेठ येथील रेल्वे अंडरब्रिज आणि नाईक तलाव ते बांगलादेश, छत्तीसगढी राम मंदिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वैशाली नगरपर्यंत २४ कोटी रुपयांचा अंडरपास मंजूर केल्याची घोषणा केली.

केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानाअंतर्गत नागपूर येथील नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शुक्रवारी (दि. १४ एप्रिल) श्री गडकरी जी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, भाजप नागपूर शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीण दटके जी, श्री कृष्णा खोपडे जी, श्री विकास कुंभारे जी यांच्यास प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “नाईक तलाव व लेंडी तलाव परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब नागरिकांचा घरच्या रजिस्ट्रीचा प्रश्न रखडला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर आता त्या प्रलंबित रजिस्ट्रीला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्याने गरिबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. शहरात मोठ्या शिक्षण संस्था आल्याने पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपूरमध्ये सर्व मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. एम्ससारख्या संस्थांमुळे शहरातच सर्वप्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. याशिवाय, मिहानमुळे रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. या प्रकल्पामुळे ७८ हजार तरुणांना रोजगार मिळाला असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी १ लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन रस्ते तसेच उड्डाणपूलदेखील उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकास साध्य होण्याच्या आणि जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अनेक कामे होत आहेत.”