मुंबई, दि. ८ एप्रिल – “सकारात्मकता, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, जलद निर्णय क्षमता आणि ध्येयाप्रति वचनबद्धता ही यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपल्या पूर्वजांकडून मिळालेली देण आहे. मूल्याधिष्ठित जीवन आणि कुटुंब पद्धती ही आपली सर्वांत मोठी ताकद आहे. त्यामुळे वारसा हक्कामध्ये मिळालेली व्यावसायिकता व्यक्तीला संपत्ती आणि रोजगार निर्माता बनवते. तसेच देशाच्या विकासातदेखील मोठी भूमिका बजावते. देशातील रस्ते श्रीमंतांच्या नाही तर ‘इनव्हिट मॉडेल’च्या माध्यमातून गरीब आणि सर्वसामान्यांनी केलेल्या गुंतवणुकीतून तयार होत आहेत. त्यामुळे या गुंतवणुकीतून त्यांना व्याज प्राप्त होण्यासोबतच देशाच्या विकासात योगदानही साध्य होत आहे. देशात पैशांची नव्हे, तर चांगले काम करणाऱ्यांची कमतरता आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या (एसपीजेआयएमआर) सेंटर फॉर फॅमिली बिझनेस अँड एंटरप्रेन्योरशिपद्वारे आयोजित ‘विरासत २५’ या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. सांताक्रूझ येथील हॉटेल ताज येथे शनिवारी (दि. ८ एप्रिल) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एचडीएफसीचे अध्यक्ष श्री दीपक पारेख, जेके इंटरप्राईजेसचे सीईओ श्री अनंत सिंघानिया, भारतीय विद्या भवनचे संयुक्त कार्यकारी सचिव श्री जगदीश लखानी, श्री योगी श्रीराम, डॉ. तुलसी जयकुमार यांच्यासह इतर मान्यवर, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “गरिबी दूर करणे प्रत्येक राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. यासाठी उद्योग, कृषी आणि सेवा क्षेत्र मजबूत होणे आवश्यक आहे. तेव्हाच सर्वांना रोजगार उपलब्ध होऊन गरिबी दूर होईल. या तीन क्षेत्रांसाठी आवश्यक उत्तम पायाभूत सुविधा, दळणवळण व संवाद साधने तसेच २४ तास पाणी व वीज उपलब्ध झाल्यास ते शक्य आहे. देशातील ६५ टक्के जनता ग्रामीण क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागाचा प्राधान्याने विकास करायचा असल्यास औद्योगिक गुंतवणूक येथे मोठ्या प्रमाणावर येणे आवशक आहे. तेव्हाच ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल. मानवी नातेसंबंध हे यशस्वी राजकारण, उद्योग आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करणारी सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात नातेसंबंध जपणे आवश्यक आहे. विचार भिन्नता नव्हे, तर विचार शून्यता ही आपल्या देशाची सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या यशाचा आनंद आपल्यापेक्षा आपले सहकारी मित्र परिवार आणि आपल्या कुटुंबीयांना होतो, ते खरे यशाचे गमक आहे. व्यावसायिकता सभ्यता, नम्रता आणि प्रत्येकाचा आदर राखण्याचा गुण असेल, तरच त्याला दुप्पट यश प्राप्त होते. त्याचसोबत यशस्वी व्यवसायासाठी काळानुरूप स्वतःत बदल करणेदेखील आवशक आहे.”