केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर, दि. २ एप्रिल – “नागपूर शहर व जिल्ह्यात सुरू असलेली विविध विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून ती पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. याशिवाय, उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्यासंबंधी सर्व यंत्रणांनी काळजी घेऊन कोणत्याही भागाला पाण्याची कमतरता भासणार नाही, याची व्यवस्था करावी. तसेच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचादेखील सामना करण्यासाठी संबंधित उपाययोजना करावी,” असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी दिले.
नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांची आढावा बैठक रविवारी (दि. २ एप्रिल) रवीभवन सभागृहात श्री गडकरीजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार श्री प्रवीण दटके, श्री कृष्णा खोपडे, श्री विकास कुंभारे, श्री मोहन मते, श्री समीर मेघे, श्री टेकचंद सावरकर, श्री आशीष जयस्वाल, महापालिका आयुक्त श्री बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी डॉ. श्री विपिन इटनकर, नासुप्रचे सभापती श्री मनोजकुमार सूर्यवंशी, स्मार्ट सिटीचे सीईओ श्री गुल्हाणे, मेट्रोचे एमडी डॉ. श्री ब्रिजेश दीक्षित, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी श्री असाटी, जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. श्री राज गजभिये, आयजीएमसीचे अधिष्ठाता डॉ. श्री संजय बिजवे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केळीबाग रस्ता, रामजी पहेलवान रस्ता, अजनी- सोमलवाडा रस्ता, जुना भंडारा मार्गाचा विकास, पारडी नाका मटन मार्केट, मेट्रोकारिता एलआयसी चौकात करावयाचे भूसंपादन, टेकडी उड्डाणपूल, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, बुधवार बाजार (महाल) आणि बुधवार बाजार (सक्करदरा), सोख्ता भवन, नेताजी मार्केट येथील परवानाधारकांना पर्यायी जागा, डिक दवाखाना येथे कन्व्हेन्शन सेंटर व कम्युनिटी हॉल, पाचपावली मार्केट (कमाल टॉकीजजवळ), दानागंज इमारत, जिंजर मॉल, गोकुळपेठ बाजार, दिव्यांग पार्क, बेसा-बेलतरोडीनगर पंचायत, रामटेक गडमंदिर परिसराचा विकास, पुनापूर-भरतवाडा येथील विट भट्टी, स्वीकार मतिमंद ऑटिस्टिक सी. पी. बहुविकलांग मुलांच्या पालकांची संस्था तसेच ई-रिक्षा धारकांच्या समस्यांसह अनेक प्रकल्पांच्या कामाच्या विकासाचा आढावा श्री गडकरीजी यांनी घेतला. नागपूर शहरातील प्रस्तावित नवीन रस्त्यांच्या आणि सर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पासंबंधीही यावेळी चर्चा करण्यात आली.