नागपूर, दि. १० मार्च – “समाजातील शोषित, पीडित, दलित आणि दिव्यांग यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. त्यांनाही समाज्याच्या मुख्य प्रवाहात सामावून घेत स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. हीच आपल्या संत आणि थोर व्यक्तींची शिकवण आहे. आजच्या या साहित्य वाटपाद्वारे ‘सीएमपीडीआय’ने या दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे बळ दिले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट (सीएमपीडीआय) यांच्यावतीने दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ‘सीएमपीडीआय’च्या क्लब बिल्डिंग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सीएमपीडीआय’चे प्रादेशिक संचालक मनोजकुमार, ‘एलएमओ’चे प्रदेश प्रभारी सेन गुप्ता यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “अलिमको आणि समाजकल्याण विभाग यांच्या मदतीने ४० हजार दिव्यांग नागरिकांना ४० करोड रुपये किमतीचे साहित्य वाटप करण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम होता. या शिबिरामार्फत दिव्यांगांना त्यांच्या घरी जाऊन शिबिरात आणणे, तसेच येथे डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार साहित्याचे वाटप करण्यात आले होते. दिव्यांगत्वामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांच्यात न्यूनगंड तयार होऊन आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे ते स्वतःला अंधःकारात घेऊन जातात. मात्र, अशा उपक्रमांमुळे व आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्याने त्यांच्या हालचालींवर असलेले निर्बंध हटण्यास मदत होऊ शकते. त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण होऊन आपणही सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जगू शकतो, हा विश्वास जागृत होण्यास मदत होते.”