Search
Close this search box.

छत्रपती शिवरायांची ‘आदर्श गावाची संकल्पना’ ही काळाची गरज – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, १० मार्च – “छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आदर्श राजे होतेच. त्यासोबतच आदर्श पिता, पुत्र, शासक, सैनिक होते. त्यांनी मुघलशाही, आदिलशाही, औरंगजेब यांच्याशी संघर्ष करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळेस त्यांनी गावातील जनतेला चांगल्या मूलभूत सुविधा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, सगळ्यांच्या हाताला काम उपलब्ध होईल, अशा ‘शिवशाही’ अर्थात आदर्श गावाची संकल्पना मांडली होती. हीच आदर्श गावाची संकल्पना आजही अंमलात येण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गावातच लोकांना काम व जीवनावश्यक सुविधा मिळाल्या तर कोणीही गाव सोडून जाणार नाही. शहरांच्या दिशेने होणारे स्थलांतर थांबेल. यासाठी सर्वांत आधी शेतीत सुधारणा होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल या दृष्टीने विचार होण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

मौजा सावळी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. श्री पोद्दार, श्री प्रशांत कुकडे, श्री रामराव मोहाडे, सरपंच श्री गणेश चोरे, श्री दिलीप धोटे, श्री रोहित मुसळे, श्री नरेंद्र पलानकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीस प्यायला लावा. असे झाल्यास सर्वांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल. कोणालाच दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार नाहीत. याशिवाय शेतीलाही मदत होऊन उत्पन्न वाढेल. त्यासाठी उपलब्ध संधी ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. आज आपण दीड लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. तेच आपल्याकडे जवस, तीळ, भुईमूग आणि सोयाबीन याचे उत्पादन वाढल्यास आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. मात्र, आपल्याकडे गहू, ज्वारी, मक्का यांच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येते. ज्यामुळे उत्पादनाला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याचे नुकसान होते. भाजी पाल्याचीदेखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि कृषीसंबंधी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास यात मोठा बदल दिसून येईल. तेव्हाच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील ‘शिवशाही’ सत्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article