नागपूर, दि. ३ फेब्रुवारी – “राजा परांजपे, व्ही शांताराम यांच्यासह अनेक दिग्गजांनी मराठी चित्रपट सृष्टी अजरामर केली. त्याकाळात आपल्या उत्तम दिग्दर्शनाने श्री राज दत्त यांनी मराठी चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. कलेच्या क्षेत्रात एक व्रतस्थ कलाकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. वर्धा जिल्ह्यातील दत्त यांनी त्याकाळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत चित्रपट क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी अनेक नवं कलाकारांनाही संधी दिली. विदर्भ आणि महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती ही मराठी सारस्वतांच्या इतिहासातील सोनेरी पान आहे आणि त्यात श्री राज दत्त यांच्या नावाचेदेखील पान आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
श्री गडकरीजी यांच्या संकल्पनेतून दि. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे ‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ३ फेब्रुवारी) झाले. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. कार्यक्रमास प्रख्यात अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रख्यात निर्माते व दिग्दर्शक श्री राज दत्त यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला.
श्री गडकरीजी म्हणाले, “मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रांत वंदना गुप्ते यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांच्या आईकडून चित्रपटांचा वारसा मिळाला. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.”
“जुन्या गोष्टी या वर्तमानातही अनेकांना हव्याहव्याशा वाटतात. त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी या ‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.”