Search
Close this search box.

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले ज्ञान, संस्कार आवश्यक – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २९ जानेवारी : “शिक्षणाच्या बाबतीत आपण सर्वजण अतिशय संवेदनशील आहोत. भविष्यातील भारत निर्माण करायचा असेल, तर आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण देतो हे महत्त्वाचे आहे. तसेच यासाठी ज्ञान आणि चांगले संस्कार देखील आवश्यक आहेत. या दोन्हींमध्ये समन्वय साधून प्रतापनगर शिक्षण संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना संस्कारित करून व उत्तम नागरिक बनवून आज ते समाजात चांगले काम करत आहेत. हेच या संस्थेच्या यशाचे गमक आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नागपूर येथील प्रताप नगर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर महानगरचे सहसंचालक श्री श्रीधरराव गाडगे, प्रताप नगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीश देशमुख, उपाध्यक्ष श्री शंकरराव पहाडे, सचिव सौ. अनुपमा लापडे, सुवर्ण महोत्सव स्वागत समितीचे अध्यक्ष श्री अजय नीलदावार, सचिव सौ. आरती कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

श्री गडकरी जी म्हणाले, “आपल्याला उद्दिष्ट माहिती झाल्यास त्यानुरूप आपल्याला शिक्षणाशी सांगड घालता येईल. देशाला महाशक्ती बनवायची असल्यास समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये प्रगती व विकासाची शिखरे गाठावी लागतील. यासाठी देशाची वर्तमानातील बलस्थाने व कमतरता जाणून घेऊन त्यानुसार नीती व धोरणे आखणे आवश्यक आहे. देशात शिक्षणाचे सार्वत्रिकरण होणे गरजेचे आहे. निपुण मनुष्यबळ तयार करण्यासाठी शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध असायला हव्यात. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.”

“ज्ञानाचा संबंध केवळ विज्ञानाशी नसून तो इतिहास, संस्कृती, परंपरा, साहित्य, सामाजिक-आर्थिक परिवर्तनात होणाऱ्या अनेक घटना, तसेच आर्थिक-कृषी-औद्योगिक विकासासोबतच अंधःकारातून प्रकाशाकडे नेण्याशी आहे. तसेच दारिद्र्य, बेरोजगारीतून साधनसंपन्नतेकडे नेण्याशी देखील आहे. ज्ञानातून आर्थिक प्रगती व्हायला हवी. तेव्हाच आपण कौशल्य, शिक्षण, विज्ञान, संशोधन या माध्यमातून जगाचे मार्गदर्शन करू शकूत,” असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article