यशस्वी शेतीसाठी कृषी प्रदर्शने ठरू शकतात फायदेशीर – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

कोल्हापूर, दि. २८ जानेवारी – “शेतकरी समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी तसेच शेतीसाठी लागणारे बियाणे, कलम यासह नवनवीन तंत्रज्ञान, प्रोसेसिंग आणि मार्केटिंगपर्यंत सर्व विषयांची माहिती अशा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मिळते. या माहितीच्या आधारे त्यांचे उत्पन्न वाढण्यासह ते आत्मनिर्भर बनण्यासाठीदेखील मदत होऊ शकते. येथे मिळणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाचाही त्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो. त्यामुळे असे प्रदर्शन आयोजित होण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

कोल्हापूर येथे आयोजित भीमा कृषी प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्री धनंजय महाडिक यांच्यासह अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “पर एकरी उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे याशिवाय उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढल्यास या क्षेत्राला आणखी बळ मिळणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात संशोधन वाढल्यास शेतीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. आताची गरज ओळखून शेतकऱ्यांनी अन्नदातासोबतच ऊर्जादाता होण्याचीदेखील गरज आहे. जैवइंधन निर्मितीमध्ये योगदान दिल्यास देशाचा पेट्रोल, डीझेल आयातीवरील खर्च कमी होईल आणि प्रदूषण रोखण्यासही मोठी मदत होऊ शकेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *