सांगली, दि. २७ जानेवारी – “पेठ नाका ते सांगली या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात जमीन अधिग्रहणामुळे अडचणी आल्या. त्यामुळे रस्त्याचे काम लांबत गेले. मात्र, आता यावर मात करत एक महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होणार आहे. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे या रस्त्यावर पुढील ५० वर्षे एकही खड्डा पडणार नाही, या दर्जाचे काम करण्यात येत आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची समस्या सुटणार आहे. त्यामुळे वेगात प्रवास होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ८६०.४५ कोटी रुपये किमतीच्या आणि ४१.२५० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुरेश खाडे, खासदार श्री संजयकाका पाटील, खासदार श्री धैर्यशील माने, माजी मंत्री व आमदार श्री जयंतराव पाटील, आमदार डॉ. श्री विश्वजित कदम, श्री धनंजय गाडगीळ, आमदार श्री गोपीचंद पडळकर, सुमन पाटील, श्री मानसिंग नाईक, श्री विक्रम सावंत यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “२०१४ पूर्वी सांगली जिल्ह्यात १०० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग होता. मात्र, त्यानंतर २९८ किमी लांबीचा रस्ता घोषित केला. गेल्या आठ वर्षांत ४४४ किमी लांबीच्या रस्त्याची ६ हजार कोटी रुपयांची २८ कामे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय २१४ किमी लांबीची ६१६९ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आणि मंजूर झाली आहेत. पुण्यात रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते बंगळुरू रस्त्याने आल्यास सांगली २ तासांत गाठता येणार आहे. यामुळे प्रवास आणि इंधनाचा खर्च वाचणार आहे. याशिवाय, या महामार्गाच्या शेजारी लॉजिस्टिक, इंडस्ट्रियल पार्क, स्मार्ट सिटी आणि स्मार्ट व्हिलेज झाल्यास या परिसराचा आणखी विकास होणार आहे. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-कर्नूल-चेन्नई या नवीन तयार होणाऱ्या महामार्गामुळे पुणे-बंगळुरू या महामार्गावरील अर्धा भार कमी होणार आहे.”