मुंबई ते फलटण प्रवास होणार ३ तासांत पूर्ण – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

फलटण (जि. सातारा) २७ जानेवारी – “सातारा जिल्ह्यात २०१४ पासून आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गात १८ पटीने वाढ झाली आहे. २०१४ पूर्वी जिल्ह्यात केवळ ४९ किमीचा राष्ट्रीय महामार्ग होता. त्यात आता वाढ होऊन तो ८५९ किलोमीटर झालेला आहे. आतापर्यंत झालेली आणि मंजूर कामे यासाठी २७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई ते बेंगळुरू आणि नागपूर ते बेंगळुरू हे दोन महामार्ग फलटणमधून जाणार आहेत. पुण्याचा रिंगरोड झाल्यानंतर मुंबई ते फलटण तीन तासात प्रवास पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणेमार्गे मिळणाऱ्या कनेक्टिव्हिटीमुळे हा मार्ग फलटणसाठी वरदान ठरणार आहे. याशिवाय, महामार्गाच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या अमृत तळ्यांमुळे परिसरातील शेतीलाही फायदा होणार आहे. नवीन होऊ घातलेल्या अहमदनगर, सोलापूर, कर्नुल, बेंगळुरू ते चेन्नई या महामार्गामुळे पुणे ते बेंगळुरू महामार्गावरील भार कमी होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले. 

फलटण येथील १५३९ कोटी रुपये किमतीच्या व १३६ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्री श्रीनिवास पाटील, खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार श्री रामराजे नाईक निंबाळकर, आमदार श्री दीपक चव्हाण, आमदार श्री महेश शिंदे, आमदार श्री शहाजी बापू पाटील, सातारचे जिल्हाधिकारी श्री रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. उंडवडी कडेपठार ते बारामती आणि फलटण या ३४ किमी लांबीच्या मार्गाचे चौपदरीकरण, शिंदेवाडी ते वरंधा घाट मार्गाचे दुपदरीकरण आणि काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, तसेच सातारा ते लोणंद या रस्त्याच्या करण्यात आलेल्या डांबरीकरण कामाचे लोकार्पण झाले. यावेळी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी केलेल्या फलटण ते दहिवडी रस्त्याच्या कामाला श्री गडकरीजी यांनी मंजुरी दिली.

श्री गडकरीजी म्हणले, “पंढरपूर, आळंदी, देहू हे आपले दैवत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिलेले विचार आणि तुकाराम महाराज यांनी गाथेच्या माध्यमातून समाजाला घडवलेले अध्यात्माचे दर्शन हे भविष्यातील पिढी निर्माण करण्यासाठी मिळालेले अमृत आहे. महाराष्ट्र ही संतांप्रमाणेच वीरांचीही भूमी आहे. अनेक क्रांतिकारकांनी या देशाला इतिहास दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आदर्श पिता, राजा, शासक कसा असावा, याची शिकवण देते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सातारा ही भूमी आहे. त्यामुळे पालखी मार्गाचे काम करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.”

“पंढरपूरच्या ओढीने ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता अनवाणी पायी सर्व वारकरी विठ्ठल नामाच्या धुंदीत पुढे जात असतात. त्यावेळी त्यांचे पाय जळत असतानाही केवळ पंढरपूर गाठण्याची ओढ यामुळे त्यांना कसलीही जाणीव होत नाही. मात्र, पालखी मार्गामुळे आता निर्विघ्न आणि कोणताही अडथळा न येत वारी करता येणार आहे. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला टाईल्समध्ये गवत लावल्यामुळे पायी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचे पाय भाजणार नाहीत, अशी व्यवस्था असणार आहे. याशिवाय, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेल्या वृक्षवल्ली, महाराष्ट्रातील संतांचा, संत वाङ्मय आणि संस्कृतीचा इतिहास या मार्गावरून जाताना अनुभवण्यास मिळणार आहे. जवळपास १२ हजार कोटी रुपये खर्चाचा हा मार्ग पूर्णतः आला आहे. या मार्गावर पुणे येथे तीन ठिकाणी डबल डेकर उड्डाणपूल असल्याने वाहतुकीसह वारी काळात वारकऱ्यांसाठीही सहज सोपा होणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *