नागपूर, दि. २१ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूर येथे दि. ८ ते २२ जानेवारीदरम्यान पाचव्या ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत स्वातंत्र्यसैनिक ईश्वर देशमुख सभागृह येथे दिव्यांग खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन तसेच व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने शनिवारी (दि. २१ जानेवारी) विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी श्री गडकरीजी यांनी स्पर्धास्थळी भेट दिली.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना श्री गडकरीजी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच, त्यांनी सहभागी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला. या स्पर्धांच्या माध्यमातून दिव्यांगांमधील खेळाडू वृत्तीला उत्तेजन तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवण्याची संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.