नागपूर, २५ नोव्हेंबर – “ज्ञानाचे रूपांतर समृद्धीमध्ये करणे, हे आपल्या देशाचे भविष्य आहे. जगात सगळीकडे अमेरिका, युकेसारख्या देशात भारतीय डॉक्टरांप्रती आदर आहे आणि ही आपल्या भारतासाठी मोठी पुंजी आहे. डॉक्टर्ससोबतच भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्स संपूर्ण जगात उत्कृष्ट मानले जातात, ” असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी काढले.
नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉइंट, रामदास पेठ येथे आयोजित ‘८ व्या इंडियन अकॅडमी ऑफ ऑटोरायनोलोरंगाॅलाॅजी हेड अँड नेक सर्जरी’ परिषदेत ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. श्री. मिलिंद कीर्तने, डॉ. श्री. मदन कापरे, प्रोफेसर श्री. के. के. हांडे, प्रोफेसर श्री. गौतम खुणार, डॉ. श्री. नंदू कोलवाडकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी म्हणाले, “जपानच्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मला खूपदा मिळते. जपानच्या पंतप्रधानांशी देखील बरेचदा संवाद होतो. भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर्स हुशार असण्यामागचे रहस्य काय, असे ते विचारतात. त्यांची ही जिज्ञासा म्हणजे भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आपल्यासारखी तज्ज्ञ मंडळी ज्यांना संपूर्ण जगातून आदर आणि मान्यता मिळते, ते केवळ आपल्या ज्ञानामुळे, अनुभव, संशोधन आणि शिक्षणामुळेच! आपल्यापैकी बरेच डॉक्टर्स केवळ त्यांच्या क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. ही खरीच खूप कौतुकाची बाब आहे.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी पुढे म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रात सर्जनची भूमिका महत्त्वाची आहे. कारण सध्या तोंडाचा कर्करोग हे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आपल्याला त्यावर खूप संशोधन करणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही तज्ज्ञ मंडळी आहात, जे समाजाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतात. इथे तुम्ही गरिबांसाठी ऑपरेशन्स करत आहात, त्याचा मला अभिमान आणि आनंद आहे. समाजातर्फे मी आपणास सर्वांचे आभार मानतो. गरीब लोकांसाठी कमी खर्चात उपचार करण्यासाठी डॉ. कीर्तने मुंबईहून नागपूरला यायचे. म्हणजेच सामाजिक जाणीव आणि जबाबदारी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची आहे. मी काही डॉक्टर नाही. यामुळे मी इथे फिट बसत नाही; पण राजकारणी हा प्रत्येक जॉबमध्ये फिट बसतो. भक्कम राजकीय इच्छाशक्ती ही आयुष्यात प्रचंड महत्त्वाची आहे… आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात, मग ते क्षेत्र बिजनेस असो, आपलं प्रोफेशन असो किंवा सामाजिक कार्य असो!”