केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : मौदा वाय-जंक्शन येथे सहापदरी उड्डाणपूल व कन्हान नदीवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन
नागपूर – ‘शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विशेषत्वाने काम सुरू आहे. गावात सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, गावांना जोडणारे रस्ते उत्तम व्हावे आणि गावांचा विकास झाला पाहिजे ही भावना आहे. चांगल्या रस्त्यांमुळे उद्योग येतात आणि रोजगाराचेही दालन खुले होत असते. आणि गावांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त होतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.
ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते मौदा वाय-जंक्शन येथे सहापदरी उड्डाणपुलाचे व कन्हान नदीवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले. सहापदरी उड्डाणपुलासह चार पदरी काँक्रीट रस्ता, माखनी येथे पुलाचे बळकटीकरण गोवरी-कोटगाव-राजोला या मार्गावर कन्हान नदीवरील पूल या कामांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, आमदार राजू पारवे, माजी आमदार अशोक मानकर, पुजनीय बालकदास महाराज, जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार, श्रीमती वाडीभस्मे यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपल्या भागातील सिंचन प्रकल्पांचा पूर्ण वापर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे. सिंचन वाढले तर शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. रस्ते बांधत असताना प्रत्येकवेळी जलसंवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यावर आम्ही भर दिला. तलावांचे खोलीकरण केले, नदी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले. या भागातही खूप तलाव आहेत. इथे गोड पाण्यातील झिंग्यांचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. येथील झिंजे जगात निर्यात केले तर तलावातून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे,’ असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.
कन्हान नदीवरील पुलामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यासाठी आणखी एक रस्ता होणार आहे. आंभोऱ्यासाठीही एक चांगला मार्ग तयार होणार आहे. भंडाऱ्याकडून पवनीच्या मार्गे आंभोऱ्याला येता येईल आणि आता या मार्गाने देखील सोय झाली आहे. हा पूल तयार झाल्यानंतर उद्योगांसाठी दळणवळणाकरिता मोठी सुविधा होणार आहे, असेही ते म्हणाले. परमात्मा एक सेवक समाजाचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनाही त्यांनी अभिवादन केले. ते म्हणाले, ‘आपल्या भागात बाबा जुमदेवजी यांचा मोठा प्रभाव आहे. माझ्या तरुणपणी गोळीबार चौकातील त्यांच्या घरी भेटण्याची संधी मिळाली. समाज संस्कारित करणे, व्यसनाधिनतेपासून मुक्त करणे आणि मुल्यांच्या आधारावर समाजाचा विकास करणे, यासाठी त्यांनी प्रबोधन केले.’
‘उड्डाणपुलाला स्व. महादेवराव वाडीभस्मे यांचे नाव’
‘महादेवराव वाडीभस्मे यांनी पक्षासाठी खूप काम केले. महादेवराव गोवरीवरून नागपूरला सायकलने यायचे. त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांचे सहकार्य कधीही विसरणार नाही. महादेवराव यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या श्रमामुळे आज आम्हाला चांगले दिवस बघायला मिळत आहेत. महादेवराव वाडीभस्मे यांनी अनेकदा माझ्याकडे या पुलाची मागणी केली. पण त्यांच्या हयातीत हा पूल होऊ शकला नाही, याची खंत आहे. त्यांचे जाणे हा माझ्यासाठी धक्का होता. आजचा कार्यक्रम महादेवरावांसाठी खरी श्रद्धांजली आहे,’ अशा भावना व्यक्त करून ना. श्री. गडकरी यांनी पुलाला स्व. महादेवराव वाडीभस्मे यांचे नाव देणार असल्याची घोषणा केली.