‘स्कुल चले हम’ उपक्रमाचे उद्घाटन
नागपूर, दि. १९ मे – महिलांमध्ये कौशल्य, सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करून त्यांना काळानुरुप ज्ञान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यातून स्वयंरोजगाराचा मार्ग सापडला तर महिला सशक्तीकरणाचा उद्देश्य साध्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वर्धमान नगर येथील माहेश्वरी भवनमध्ये सरजूदेवी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘स्कुल चले हम’ या उपक्रमाचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. कृष्णा खोपडे, सरजूदेवी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष संतोष लढ्ढा आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘आज काळ बदलला आहे. रिक्षा ओढणाऱ्या १ कोटी लोकांपैकी ९५ टक्के लोक आज ई-रिक्षा चालवतात. आता दिव्यांगांना आणि महिलांनाही ई-रिक्षाचा परवाना मिळाला आहे. आपल्या देशात आयएएस अधिकारी म्हणून, एअरफोर्समध्ये फायटिंग पायलट म्हणून महिला काम करतात. हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या मनातील न्यूनगंड दूर करून केवळ सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करावे.’ महिला आणि पुरुषांमध्ये जात, धर्म, लिंग, पंथ, क्षमता, भाषा याच्या आधारावर कधीही भेद करू नये, असेही ते म्हणाले. महिला सशक्तीकरणासाठी काम करणाऱ्या सरजूदेवी फाउंडेशनचे ना. गडकरी यांनी कौतुक केले. महिलांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ देणे आणि स्वतःच्या पायावर उभे होण्यासाठी व्हिजन देणे, यावर जोर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
महिला सशक्तीकरण भाषणांमधून होणार नाही, त्यासाठी कृती आवश्यक आहे. जे काम पुरुष करतात, ते आपणही चांगल्या प्रकारे करू शकतो, ही सकारात्मकता समाजातील प्रत्येक वर्गातील महिलांमध्ये निर्माण व्हायला हवी. त्यांना भविष्याचा वेध घेऊन प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी पाचगाव येथे सतरंजी तयार करून महिन्याला १० हजार रुपये रोजगार मिळविणाऱ्या १२०० महिलांचे उदाहरणही त्यांनी दिले.
‘बँक ऑफ आयडियाज’
सरजूदेवी फाउंडेशनने सीबीएसई शाळा सुरू करून मुलींसाठी ‘बँक ऑफ आयडियाज, इनोव्हेशन आणि रिसर्च’ हा उपक्रम हाती घ्यावा. महिलांकडे असलेल्या कौशल्याला योग्य व्यासपीठ देऊन वेबसाईटच्या माध्यमातून त्याचा प्रचार-प्रसार करावा. यातूनच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.