नागपूर, दि. १ मे – “भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’च्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तींच्या विकासाचा ध्यास घेतला. तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गोष्टी उपलब्ध होऊन त्याचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, तोपर्यंत संघटनेचे काम अविरत सुरू राहील हा विचार त्यांनी दिला होता. या विचारातून प्रेरणा घेऊन आजही प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे. असंघटित क्षेत्रातील शोषित, वंचित, पीडितांना संघटित करून त्यांचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न कसे होईल, या उद्देशाने या कामगार मोर्चाची स्थापना करण्यात आली. शोषित, वंचित लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांमुळे आज संघटना नावारूपाला आली आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या पूर्व विदर्भ कामगार मोर्चाच्या वतीने भव्य कामगार मेळावा आणि उत्कृष्ट कामगारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँक सभागृहात सोमवारी (दि. १ मे) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, सरचिटणीस श्री संजयजी केनेकर, भाजप कामगार मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री गणेशजी ताटे, भाजप नागपूर शहराध्यक्ष प्रवीणजी दटके, संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कवठेकर, श्री भास्करजी पराते, श्री संजय जी भेंडे, श्री जयप्रकाशजी गुप्ता, श्री अजयजी दुबे, श्री शरदजी पाटील यांच्यासह इतर मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार बांधव उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “एक माणूस दुसऱ्या माणसाला सायकल रिक्षातून उन्हा-तान्हात, पावसात घेऊन जाताना पाहिल्यावर दुःख होत होते. मात्र, आज कायद्यामुळे त्यांचे जीवन बदलले आहे. ई-रिक्षामुळे दीड ते दोन कोटी सायकल रिक्षाचालकांना पाठीवरून किंवा रिक्षा ओढत घेऊन जाण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे त्यांची मानवीय शोषणातून मुक्ती झाली आहे. हेच माझ्या आयुष्यातील मोठे आणि चांगले काम आहे. तसेच नागपूरमधील दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासोबतच त्यांच्या जीवनातील असहाय्यता दूर होणार आहे. शोषित, पीडित समाजाच्या कल्याणाकरिता काम करण्याच्या उद्देशाने या कामगार मोर्चाची स्थापना झाली.”
“बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अडीच ते तीन लाखांत पक्की घरे उपलब्ध करून दिली होती. ज्यामुळे त्यांना हक्काचे छत मिळाले आहे. आता बुटीबोरीला स्मार्ट करून त्याचा आणखी विकास करण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे २४ तास पाणी व वीज, उद्यान, मुलांना खेळाची मैदाने, उत्तम शिक्षण संस्था, रुग्णालय आदी जीवनावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, टाटा टेक्स्टाईल मिलमधील ६०० कामगारांची पेंशनची रक्कम अडकली होती. त्यावेळी जे.आर. डी. टाटा यांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे गरीब आणि वंचित समाजाची सेवा, हीच खरी ईश्वर सेवा आहे.”