नागपूर, दि. ३० एप्रिल – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून रविवारी (दि. ३० एप्रिल) देशवासीयांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाच्या शतकपूर्तीनिमित्त व्हेरायटी चौक येथील ‘वायएमसीए’ हॉल येथे या कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण करण्यात आले होते. नागपूरकरांना देखील या कार्यक्रमात सहभागी होता यावे, या उद्देशाने याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी कार्यक्रमात सहभागी होत विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्थानिक नागरिकांसोबत कार्यक्रमाचे श्रवण केले.
‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी नागरिकांशी संवाद साधताना, ऑक्टोबर २०१४ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या आवृत्तीला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक आवृत्ती आपापल्या परीने विशेष असल्याचे सांगत देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयोगटांतील नागरिक या कार्यक्रमाशी जोडल्या गेले असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत चळवळ, खादीला प्रोत्साहन, प्रकृति की बात, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, अमृत सरोवर अशा अनेक विषयांवर आपले विचारही मांडले. याशिवाय, ‘मन की बात’ची प्रत्येक आवृत्ती ही एक लोकचळवळ बनली असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक आवृत्तीप्रमाणे आजची १००वी आवृत्तीदेखील विशेष आणि प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.