नागपूर, दि. १५ एप्रिल – “आपले दैवत आणि धार्मिक स्थळे ही जगण्याचा मार्ग देतात. त्यामुळे त्यांचे पावित्र्य जपणे आपले कर्तव्य आहे. धर्माकडून मिळणारी शिकवण व विचार जीवनात आत्मसात करून त्यानुसार आचरण करत राहणे, हेच खरे धर्माचे पालन आहे. आपले जीवनमूल्य, कुटुंब पद्धती आणि जीवन पद्धती हे आज सर्व विश्वाचे आकर्षण झाले आहे. अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेद्वारे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनासारख्या कार्यक्रमांतूनच भविष्य घडवण्याची दिशा आणि त्या दिशेने योग्य मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. समाज्याच्या उन्नतीचा विचार प्रदान करण्याचे संस्थेचे हे काम कौतुकास्पद आहे. याशिवाय उद्योग व्यवसायाद्वारे गरजूंना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून चांगले काम करण्यात येत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेद्वारे ‘संकल्प २३ – समाज उन्नतीचा’ या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी (दि. १५ एप्रिल) आयोजन करण्यात आले होते. रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रम श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “देशाची प्रगती ही समाज्याच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून आहे. यासाठी शिक्षण गरजेचे असून शिक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे येत असून देश झपाट्याने बदलत आहे. बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांत देशातील तरुण पिढी आपले कर्तृत्त्व सिद्ध करत आहेत. देशातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्यवसायात काम करणाऱ्यांना आज जगात मोठा मान आहे. अमेरिकेतील चांगल्या दहा डॉक्टरपैकी सहा डॉक्टर हे भारतीय आहेत आणि हे केवळ ज्ञानामुळे शक्य झाले आहे. युवापिढी ही देशाचे भविष्य आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम समाजातील ज्येष्ठांचे आहे. समाजात वावरत असताना सहवासात येणारी व्यक्ती आणि मिळणाऱ्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याच पुढे जाऊन जगण्याचे बळ देतात. त्यामुळे केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण समाजाचाच विकास होतो.”