पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २६ मार्च – “पर्यावरणाबद्दल आजही समाजात मोठी उदासीनता असून याविषयी पुढाकार घेऊन काम करण्यास कोणीही तयार नाही. जनजागृतीनंतरही समाजाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. जीवाश्म इंधन हे देशातील प्रदूषणाला सर्वांत जास्त कारणीभूत आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि जीवाश्म इंधन हद्दपार होण्याची आवश्यकता आहे. वाढते प्रदूषण ही देशातील मोठ्या शहरांमधील सगळ्यात मोठी समस्या आहे. याचा परिणाम तेथील नागरिकांवरदेखील दिसून येत असून त्यांना कोणत्या ना कोणत्या आरोग्याच्या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे वेळीच सावध होत याविषयी सर्वांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

वनराई फाउंडेशनद्वारे देण्यात येणाऱ्या स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्काराने श्री गडकरीजी यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉ. श्री रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. नागपूरमधील आयटी पार्क येथील परसिस्टंट सभागृह येथे रविवारी (दि. २६ मार्च) आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल व खासदार श्री श्रीनिवास पाटील होते. यावेळी डॉ. श्री. वेद प्रकाश मिश्रा यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

स्व. डॉ. मोहन धारिया यांच्या नावाने असलेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल वनराई फाउंडेशनचे आभार मानत श्री गडकरीजी म्हणाले, “स्व. डॉ. मोहन धारिया यांना पर्यावरणाविषयी मोठी जाण होती, तसेच त्यांचे या विषयात मोठे कामदेखील आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणातूनच त्यांना खरी श्रद्धांजली देता येईल. आज प्लास्टिकपासून क्रूड ऑइल आणि कचऱ्यापासून रस्ते निर्माण होत आहेत. याशिवाय, जैविक इंधनाला प्रोत्साहनामुळे आज कृषी मालापासून पर्यावरण पूरक इंधन तयार होत आहे. यामुळे पर्यावरणरक्षणासह अन्नदाता शेतकऱ्यालाही आर्थिक फायदा होत आहे. याशिवाय, इंधन आयातीवर होणारा खर्चदेखील वाचणार आहे. रिकाम्या जागांवर बांबूची लागवड केल्यास हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. तसेच, संशोधनाद्वारे पर्यावरण पूरक आधुनिक तंत्रज्ञान तयार झाल्यास देशाचा शाश्वत विकासही होणार आहे. जैविक इंधनासोबतच सौर ऊर्जा निर्मिती आणि जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास अर्ध्या समस्या दूर होणार आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *