नागपूर, दि. २६ मार्च – “भविष्याची कास धरून सोनार समाजाने पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देणे आवश्यक आहे. तेव्हाच जगाच्या स्पर्धेत टिकून राहून प्रगती साध्य करता येणार आहे. गुणवत्ता, नावीन्य आणि ब्रॅंडिंगदेखील यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक आहे. याशिवाय, तंत्रज्ञानासोबतच नवकल्पना, संशोधन आणि डिझाइनलाही तेवढेच महत्त्व आहे. शैक्षणिक विकासासोबतच सामाजिक परिवर्तन, आर्थिक विकास आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण या आधारावर भावी यशस्वी उद्योजक निर्माण होतील. यासोबतच रोजगार वाढून समाज परिवर्तन होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र सोनार संस्थेच्या वतीने रेशीम विभाग येथील सुरेश भट सभागृहात रविवारी (दि. २६ मार्च) सोनार महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी अकोला अखिल भारतीय माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष श्री विलासराव अनासाने, आपलं घर पुणे चे संस्थापक श्री विजयराव फळणीकर, महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम कावळे, महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष श्री विलास बांगरे, श्री राजेश रोकडे, श्री प्रकाश माजणे, श्री सौरभ ढोमणे, श्री अनिल मालोकर, श्री विलास नासने यांच्यासह इतर मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. यामधून फायदा करून घेण्यासाठी निर्यात वाढवण्याची आवश्यकता आहे. जगात हिऱ्यांच्या क्षेत्रात भारतीयांचे वर्चस्व आहे. भारतातून हिरे आणि त्याचे दागिने आज मोठ्या प्रमाणात निर्यात होत असून त्याला मोठी मागणी आहे. पारंपरिक व्यवसायाची पार्श्वभूमी नसतानादेखील काही मोठ्या व्यावसायिकांचा डायमंड आणि सोन्याचे दागिने विक्रीच्या व्यवसायात दबदबा निर्माण केला आहे. उत्पादनात असलेले वेगळेपण, गुणवत्ता आणि योग्य मार्केटिंग यामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे पारंपरिक सोनार समाजाने भविष्यातील संधी ओळखून काळानुरूप बदल करत राहणे आवश्यक आहे.”