नागपूर, दि. २५ मार्च – अखंड भारताची संस्कृती, इतिहास आणि ऐतिहासिक वारशाला आपण आजही विसरलेलो नाही. पूर्वजांनी अखंड भारतासाठी दिलेले बलिदान, विभाजनानंतर आलेली संकटे आणि अत्यंत धैर्याने केलेला त्यांचा सामना याची आजही जाणीव आहे. या संकटांवर मात करत आज प्रगतीच्या आणि विकासाच्या दिशेने देश आणि समाज वाटचाल करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
जरिपटका येथील दयानंद पार्क येथे भारतीय सिंधू सभेद्वारे झुलेलाल महोत्सवाचे शनिवारी (दि. २५ मार्च) आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. याप्रसंगी भारतीय सिंधू सभेचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “झुलेलाल जी यांना आपण वरुण देवाचे स्थान देतो. केवळ सिंधी समाज नव्हे, तर आपली हिंदू संस्कृती आणि इतिहासात त्यांना जलदेवतेच्या रूपात मानण्यात आले आहे. त्यांचे पूजन करून आपण आपली संस्कृती आणि इतिहास यांचे स्मरण करून जल, वायू, पृथ्वी, आकाश व अग्नी या आपल्या पंचमहाभुतांची पूजा केली जाते. या पूजनाला आपल्या संस्कृतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. जल, जमीन, जंगल आणि जनावर हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्याला आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करायचे आहे. ज्यांची जलदेवतेच्या रूपात आपण झुलेलाल यांची पूजा करतो, त्या पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. झुलेलालजींना स्मरण करून जलसंवर्धनाचे कार्य करणे, हीच त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट आदरांजली ठरेल.”
“पळणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावाचे पाणी गावात, शेताचे पाणी शेतात आणि घराचे पाणी घरात, हा मंत्र जीवनात अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत मिळालेल्या ६ डी. लिट. पैकी ३ या कृषिविज्ञान आणि जलसंवर्धनासाठी म्हणजेच झुलेलालजींच्या सेवेसाठीच मिळाल्या आहेत. जलसंवर्धनातूनच गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी दूर होईल आणि संपन्नता, समृद्धता व विकास साध्य करता येईल.”