नागपूर, दि. २५ मार्च – “संस्कारीत भावी पिढी घडवण्यासाठी चांगले शिक्षण आवश्यक आहे. तसेच शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करता येणे देखील आवश्यक आहे. यावरच देशाचे भविष्य अवलंबून आहे. शिक्षणावर होणारा खर्च हा संस्कारीत भावी पिढी घडवण्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. गरिबातील गरीब विद्यार्थ्यालाही चांगले शिक्षण मिळाले, तर त्याचे उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उज्ज्वल भविष्य घडण्यास मदत होईल आणि संस्कारीत भावी पिढी निर्माण करता येईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील सिंधू नवयुवक मंडळातर्फे आयोजित राजकुमार केवलरामणी सिंधू उच्च प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सव आणि राजकुमार केवलरामणी कन्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री विजयकुमार केवलरामानी, महासचिव श्री कैलास जी, उपाध्यक्ष नीलम जी, प्राचार्य डॉ. उर्मिला डबीर जी, प्रमुख प्राध्यापिका रश्मी वाधवानी जी, कोषाध्यक्ष ऋचा केवलरामानी जी, श्री संजय चौधरी जी, श्री दिलीप गौर जी, माजी नगरसेवक श्री विकी कुकरेजाजी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “प्राथमिक शाळेपासून ते डी. एड. महाविद्यालय असा संस्थेचा प्रवास अतिशय खडतर होता. मात्र, यावर मात करत ही संस्था आज मोठ्या प्रमाणात नावारूपाला आली आहे. याचे सर्वांत मोठे श्रेय श्री विजयकुमार जी यांचे आहे. महिला शिक्षणात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यातूनच कन्या विद्यालयाची सुरुवात झाली. चांगले शिक्षक, शाळेतील चांगल्या पायाभूत सुविधा या माध्यमातून मिळालेल्या शिक्षणाचा व्यावहारिक जीवनात येणाऱ्या अडचणींशी सामना करताना बळ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चांगले शिक्षण, संपत्ती आणि संस्कार यातूनच परिपूर्ण समाज घडेल. समाजात वावरत असताना आत्मसात केलेले चांगले गुण जीवनात अंमलात आणणे, हेच चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण आहे. चांगले नागरिक तसेच ज्ञानाने परिपूर्ण नागरिक आपण किती प्रमाणात घडवू, त्यावरच देशाचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे.”