सुरक्षित भविष्यासाठी योग्यवेळी व योग्यठिकाणी गुंतवणूक आवश्यक – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २५ मार्च – “भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. त्यासाठी शेअर बाजार, विमा किंवा पेन्शनसारखे पर्याय उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय व्यक्ती गुंतवणूक करू शकतील, असे नवीन मार्ग शोधण्याची गरज आहे. ज्यामुळे सर्व स्तरातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या मदत होईल. तसेच देशाच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळेल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृह येथे आयोजित ‘सिम्फोनिया समिट-२०२३’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिम्फोनिया वेल्थचे को-फाउंडर श्री अजित देशमुख, श्री भावेश खैतान, श्री सुनील चितळे यांच्यासह सदस्य, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “हॉटेल, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स यासारख्या सेवा क्षेत्रात आर्थिक सक्षमता आहे. या क्षेत्रांसोबतच कृषिक्षेत्र देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहे. सिद्ध तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि विक्री योग्यता या ४ गोष्टी यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक आहेत. सध्या अनेक स्टार्टअप्स नावारूपाला येत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे काम करणाऱ्या स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवण्यास गुंतवणूकदारही तयार आहेत. याद्वारे केवळ गुंतवणूकदारांच्या फायद्यासह देशाच्या विकासासाठी देखील हातभार लागत आहे. गुंतवणूकदारांच्या माध्यमातून नावारूपाला येणारे नवे तंत्रज्ञान, नवे शोध आणि नव्या कल्पना यांच्या सहाय्याने नवीन स्टार्टअप्सदेखील चमत्कार घडवून आणू शकतात.”

“२१ व्या शतकातील सर्वांत महत्त्वाचे भांडवल म्हणजे विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि सद्भावना आहे. हे सर्व गुण असलेल्या व्यावसायिकाला गुंतवणूक मिळवणे अवघड नाही. भांडवली गुंतवणुकीसाठी गरीब आणि मध्यम वर्गीय जनतेमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सद्य:स्थितीत अनेक शहरी सहकारी पतसंस्था आहेत. त्यांच्याकडे आज ३ लाख ५० हजार कोटींच्या ठेवी आहेत. विश्वासार्ह संस्था असल्यास कोणीही त्यात गुंतवणूक करण्यास तयार होते. त्यामुळे योग्य दिशेने होणारी गुंतवणूक देशाच्या सुबत्ततेसाठी आणि रोजगार निर्मितीसाठीदेखील सहाय्यक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *