दोन लाख करोड रुपये खर्चाच्या आराखड्यामुळे मिळणार चौफेर विकासाला चालना : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी
जमशेदपूर (झारखंड), दि. २३ मार्च – “खनिज आणि वन संपत्तीने समृद्ध असलेल्या झारखंड राज्याचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. मात्र, त्या तुलनेत येथील विकास होऊ शकला नाही. २०१४ पूर्वी झारखंड राज्यात केवळ २५० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात होता. मात्र, केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने प्राथमिकता देत ४ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले आहेत. याशिवाय, देशातील पहिल्या डबल डेकर उन्नत रस्ता झारखंडच्या विकासाचा केंद्र बिंदू ठरणार आहे. तसेच, २ लाख करोड रुपये खर्चाच्या विकास आराखड्यामुळे येथील चौफेर विकास साध्य होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
झारखंडच्या बिष्टुपूर, जमशेदपूर येथे ३८४३ कोटी रुपये खर्चाच्या २२० किमी लांबीच्या १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी श्री गडकरीजी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २३ मार्च) करण्यात आली. हा कार्यक्रम बिष्टुपूर येथील गोपाल मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री श्री. रघुबर दास, खासदार श्री. बिद्युत बरन महतो, खासदार श्रीमती गीता कोडा, डॉ. अनिल कुमार शर्मा, एस. के. मिश्रा यांच्यासह खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
गडकरीजी म्हणाले, “पाणी, ऊर्जा, दळणवळण आणि संवाद या चार गोष्टींवर शाश्वत विकास अवलंबून आहे. याशिवाय, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचा दर्जा यालाही तेवढेच महत्त्व आहे. त्यावरच औद्योगिक विकास आणि रोजगार अवलंबून आहे. या गोष्टी साध्य झाल्या तरच गरिबी दूर होऊ शकेल. त्यामुळे आज लोकार्पण आणि पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमुळे झारखंडच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे. झारखंडमधील रांची-जमशेदपूर मार्गावरील काली मंदिर ते बालिगुमापर्यंत १८७६ कोटी रुपये खर्चून पहिला ४ लेन डबल डेकर उन्नत रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. रांची ते जमशेदपूर इंटर कॉरिडॉरमुळे पश्चिम बंगाल-ओडिशादरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा कॉरिडॉर रांची शहराला बायपास करून दिल्ली-कोलकाता महामार्ग (एनएच २) आणि पूर्व-पश्चिम कॉरिडॉरला (एनएच ६) जोडल्या जाणार आहे. ज्यामुळे जमशेदपूर-कोलकाता अशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील हतगमरिया ते बोकना हाथीचौक (NH-320G) हा मार्ग कोलाविरा रस्त्याच्या बांधकामामुळे नक्षलग्रस्त भाग आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.”