रांची (झारखंड), दि. २३ मार्च – रांची ते जमशेदपूर रस्त्यासह लोकार्पण आणि उद्घाटन होत असलेले प्रकल्प हे तर केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी झारखंड राज्यात २ लाख करोड रुपये खर्चाचे रस्ते आणि महामार्ग तयार करणार असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात रांची ते वाराणसी प्रवास ३ तासात करता येईल अशा दर्जाचा रस्ता होणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
रांची (झारखंड) येथील ९४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या ५३२ किमी लांबीच्या २१ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाली. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री श्री बाबू लाल मरांडी जी, खासदार श्री दीपक प्रकाश जी, खासदार श्री संजय शेठ जी, श्री आदित्य प्रसाद जी यांच्यासह आमदार, अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्ते पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने देशांतर्गत प्रवासाचा वेग वाढणार आहे. यामुळे विमान प्रवासापेक्षा नागरिक रस्त्याने प्रवास करण्यास प्राधान्य देतील. गेल्या ९ वर्षांत देशातील रस्त्यांचा विकास वेगाने होत आहे. यामुळे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होण्यास जास्त वेळ लागणार नाही. चांगल्या दर्जाच्या रस्ते विकासामुळे माल वाहतूक वेगात होणार आहे. याशिवाय, इंधन आणि वेळ वाचणार आहे. भविष्यात चांगल्या रोड कनेक्टिव्हिटीमुळे लॉजिस्टिक कॉस्ट सिंगल डिजिट म्हणजे ९ टक्क्यांवर येणार आहे. शिवाय, एक्स्पोर्ट वाढून देशात औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. तसेच, सर्वांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. रस्ते वाहतुकीचा वेग वाढल्याने जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणातही घट होईल. आज हरित ऊर्जा निर्मितीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्याने केवळ धान्य न पिकवता तो अन्नदाता सोबतच ऊर्जादाताही होत आहे. सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रवास खर्चात मोठी बचत होत आहे.”