राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण
नागपूर, दि. १९ मार्च – नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या नागपूर येथील खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि. १९ मार्च) ‘जनसंपर्क’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी श्री गडकरीजी यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून अनेकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेत त्या ताबडतोब मार्गी लावल्या, तर काहींसाठी आवश्यक शासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करून त्या मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांची फरफट होऊ नये, त्यांना योग्य ठिकाणी त्यांच्या अडचणी मांडता याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करता यावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. रविवारी आयोजित ‘जनसंपर्क’ उपक्रमात विविध प्रकारच्या नागरी समस्यांसह निवृत्तीवेतनाचे प्रश्न, शाळा व महाविद्यालयातील प्रवेश, आरोग्यविषयक समस्या, मदतीची मागणी, संशोधन, लेखन कार्य, अनुकंपा तत्त्वावरील नोकरी, अतिक्रमण हटवणे यासह अनेक विषयांची निवेदने घेऊन सर्व स्तरातील नागरिक सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री गडकरीजी यांनी सुरुवातीला कार्यालयाबाहेर मंडपात थांबलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत त्यांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेत त्या सोडविल्या. त्यानंतर उपस्थित इतर नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, कामगार, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी ‘जनसंपर्क’ उपक्रमाचा लाभ घेतला.