- ‘अनुभूती इनक्लुजिव्ह पार्क’मध्ये घेता येणार विविध खेळांसह मनोरंजनाचा आनंद
- स्वतंत्र आरोग्य केंद्राद्वारे एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न
- केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर, दि. २० फेब्रुवारी – “समाजात दिव्यांगांना सन्मानाने जगात यावे, यासाठी त्यांना सर्वच क्षेत्रांत संधी उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास १५०० दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले होते. त्यामुळे आता दिव्यांगांसाठी जागतिक स्तरावरील आणि महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क उभे राहत आहे. तसेच त्यांच्यातील खेळाडू वृत्तीलाही प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘दिव्यांग स्पोर्ट्स स्टेडियम’ दक्षिण नागपूर येथे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ज्यात स्पोर्ट्स स्टेडियमसह स्विमिंग टॅंक आणि हेल्थ क्लबसारख्या सुविधा देता येतील,”असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून जगातील सर्वांत मोठे ‘अनुभूती इनक्लुजिव्ह पार्क’ नागपूर येथील पारडी येथे साकार होत आहे. त्याचे भूमिपूजन सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे हे पार्क साकारण्यात येणार आहे. दिव्यांगांनी बनवलेल्या वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन आणि दिव्यांग उन्नती पोर्टलचे लोकार्पण श्री गडकरी जी यांच्या हस्ते यावेळी झाले. तसेच दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी आमदार श्री प्रविण दटके, आमदार श्री मोहन मते, आमदार श्री कृष्णा खोपडे, नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर, जिल्हा परिषद सीईओ श्रीमती सौम्या शर्मा, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह नगरसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरी जी म्हणाले, “अनुभूती इनक्लुजिव्ह पार्कमध्ये दिव्यांगांसाठी खुली शाळा, मनोरंजनाची साधने, हायड्रोथेरेपी तलाव, ई-वाहने, स्पर्श आणि सुगंधी वाटिका, कृत्रिम धबधबा या सुविधा असणार आहे. उत्तम रेस्टॉरंटमुळे येथे आलेल्या दिव्यांगांची कमी खर्चात खाण्याची सोय होणार आहे. याशिवाय, सोलार लाईटमुळे विजेवरील खर्च वाचणार आहे. दृष्टिहीन लोकांच्या सोयीसाठी टेक टाइल्स असणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्यात आला आहे. या १२ कोटी खर्चाच्या आणि ९० हजार चौरस फुट जागेवर होणाऱ्या उद्यानामुळे दिव्यांगांनाही सर्वसामान्यांप्रमाणे जगता येणार आहे.”
“गरीब आणि गरजू दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. त्याचा नागपूर शहरातून २८ हजार व जिल्ह्यातून ८ हजार अशा ३६ हजार गरजूंनी त्याचा लाभ घेतला होता. याशिवाय, ४३ प्रकारच्या २ लाख ८१ हजार उपकरण व साहित्याचे यावेळी वाटप करण्यात आले होते. ३५ कोटी रुपयांचे हे चागल्या गुणवतेचे साहित्य दिव्यांगांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान, विविध कारणांमुळे अपंगत्व येऊन चालता येत नाही अशा २०० अपंगांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामुळे अपंगत्वामुळे उभे राहू शकत नव्हते ते आता कृत्रिम पाय बसवण्यात आल्यामुळे फुटबॉल खेळण्याचा आनंद घेत आहेत. याशिवाय, स्वतः वाहन चालवत असून त्यांना धावतादेखील येत आहे.”
नागपूरमध्ये होणार ‘दिव्यांग आरोग्य केंद्र’
“स्थानिक दिव्यांगांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार लातूरच्या धर्तीवर नागपूरमध्येदेखील आरोग्य सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ज्यात न्यूरोलॉजिकल कन्सल्टेशन, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरेपी, ब्रेल युनियन थेरेपी यांचे प्रशिक्षण आणि इइजी ४, बीआरए, ओएइ या आरोग्य निदान चाचणीही उपलब्ध होऊ शकणार आहे. या सर्व सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याने दिव्यांगांवरील आर्थिक भारही कमी होणार आहे.”
ई-रिक्षेच्या माध्यमातून दिव्यांगांनाही रोजगाराची संधी
श्री गडकरी जी म्हणाले, “ई-रिक्षेच्या माध्यमातून दिव्यांगांनाही रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, ते स्वावलंबी व्हावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण करून दिव्यांगांना वाहन चालवण्याचा परवाना व प्रशिक्षण नागपूर आरटीओच्या माध्यमातून पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागपूर महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना ई-रिक्षेचे वाटप करण्यात येईल. ज्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.”
धोबी समाजास गॅसवरील इस्त्रीचे वाटप होणार
श्री गडकरी जी म्हणाले, “विद्युत इस्त्रीमुळे कपडे इस्त्रीचा खर्च वाढतो. मात्र, तेच गॅसवरील उपकरणामुळे यात बचत होऊन हा व्यवसाय करणाऱ्या धोबी समाजास फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांना हे उपकरण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता २०० गॅसवरील इस्त्री आणि गॅस सिलिंडरचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, साखरेपासून तयार झालेले कपडे धुण्याचे पावडरदेखील त्यांना उपलब्ध करून देणार आहे. यामुळे त्यांना सुविधा होणार आहे. तसेच खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.”