नागपूर, दि. १७ फेब्रुवारी – नागपूर महापालिकेतर्फे मातंग समाजातील महिलांसाठी राम झुला परिसरात उभारण्यात आलेल्या क्रांतीपिता लहुजी साळवे जुना कापड बाजारचे लोकार्पण शुक्रवारी (दि. १७ फेब्रुवारी) केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले. या बाजारामुळे ३०० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागादेखील उपलब्ध होणार आहे.
घरोघरी जाऊन भांडी देऊन जुने कपडे गोळा करायचे. त्यानंतर या कपड्यांवर प्रक्रियाकरून ते पुन्हा घालण्यायोग्य करून ते जुन्या कपड्यांच्या बाजारात विकायचे, हा मातंग समाजातील महिलांचा पारंपरिक आणि उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. मात्र, त्यांना हा कपडा विक्री करण्यासाठी अधिकृत बाजार उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आता या बाजारामुळे त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. खासकरून उन्हाळा आणि पावसाळ्यात उध्दभवणाऱ्या अडचणीतून त्यांची सुटका झाली आहे. याशिवाय, हा बाजार दर शनिवारी भरणार असल्याने इतरवेळी वाहन पार्किंगसाठी याचा वापर करता येणार आहे. यामुळे राम झुला परिसरातील पार्किंगचादेखील प्रश्न सुटणार आहे.