नागपूर, दि. १७ फेब्रुवारी – “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कर्मयोद्धा केशवराव शेंडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. आयुष्यभर ते या विचारांवर प्रामाणिक राहिले. एक सामाजिक सेवक या भावनेतून त्यांनी सतत समाज्याच्या भल्याचा विचार केला. त्यांनी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून समाज्याच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सेवादल शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज येथून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर येथील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले नाव मोठे करत आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
सेवादल शिक्षण संस्थेच्या वतीने सक्करदरा चौक येथील सेवादल भवन येथे आयोजित कर्मयोद्धा केशवराव शेंडे यांची जयंती समारोह व तैलचित्र अनावरण सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे मुख्य संघटक श्री लालजी भाई देसाई, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री बलराम भदोरियाजी व श्री चंद्रप्रकाश वाजपायीजी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार श्री सुधीर पारवे जी, सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संजय शेंडे जी, सचिव डॉ. किरणताई बाराल, श्री खोब्रागडे, सुमनताई शेंडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “लोकशाहीत वैचारिक भिन्नता असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र, विचारांवर विश्वासच नसणे ही आजची सगळ्यात मोठी समस्या आहे. लोकशाहीत सर्वांच्या विचारांचा आदर राखला जाणे आवश्यक आहे. हीच लोकशाहीची ताकद आहे. कर्मयोद्धा केशवराव शेंडे यांनी कधीही विरोधी असलेतरीही कोणाच्याही विचारांचा अनादर केला नाही. कायमच आदर राखला. हीच त्यांच्या व्यक्तित्वाची विशेषतः आहे. त्यामुळेच ते आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.”