बास्केट ब्रिजमुळे पावसाळ्यातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

कोल्हापूर, दि. २८ जानेवारी – “पावसाळ्यात पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा या नदीवरील रस्ता अनेकवेळा बंद होते. यामुळे कोल्हापूरचा बाहेरील गावांशी संपर्क तुटतो. मात्र, आता होऊ घातलेल्या बास्केट ब्रिजमुळे ही समस्या सुटणार असून यामुळे पावसाळ्यातही विनाअडथळा वाहतूक सुरू राहणार आहे. याशिवाय, शहरात प्रवेश करणारी वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विभागली जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होणार आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

कोल्हापूर येथील ४५०२ कोटी रुपये किंमतीच्या व ७९.४३५ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री व राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्री धनंजय महाडिक, खासदार श्री संजय मंडलिक, खासदार श्री धैर्यशील माने, आमदार श्री महादेवराव महाडिक, आमदार श्री पी.एन. पाटील सडोलीकर, आमदार श्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे, श्री मकरंद देशपांडे, श्री अंमल महाडिक, शौमिका महाडिक, श्री संतोष शेलार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

सांगली ते कोल्हापूर रस्ता सिमेंटकाँक्रीटचा करण्याच्या मागणीला श्री गडकरीजी यांनी मान्यता दिली. चांगल्या गुणवतेचा असल्याने या रस्त्याचे आयुष्य वाढणार असून पुढील पन्नास वर्षे कुठलाही खड्डा यावर पडणार नाही. तसेच, हातकणंगले येथे भारत सरकारच्या ४०० एकर जागेत सॅटॅलाइट किंवा ड्रायपोर्ट राज्य सरकारकडून जागा हस्तांतरित झाल्यानंतर उभारण्याचे आश्वासन यावेळी श्री गडकरीजी यांनी दिले. हा प्रकल्प झाल्यास येथील कृषीसह औद्योगिक उत्पादीत माल येथूनच एक्सपोर्ट होण्यास मदत होणार आहे.

श्री गडकरीजी म्हणाले, “सातारा ते कागल हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे दोन टप्प्यात काम होणार असून पहिला कागल ते पेठनाका आणि दुसरा पेठ नका ते सातारा असा असणार आहे. या सहापदरी रस्त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. याशिवाय, पुणे येथील रिंगरोड झाल्यानंतर मुंबई ते पुणे पुढे बंगळुरू असे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. मुंबई ते पुणे दीड तास आणि पुणे ते बंगळुरू साडेचार तासात गाठता येणार आहे. या रस्त्याशी कोल्हापूर आणि बेळगाव जोडण्यात येणार आहे. तसेच सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कर्नुल आणि बंगळुरू या काम सुरू असलेल्या महामार्गामुळे पुणे ते बंगळुरू या महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. उत्तर भारतातून सुरत, मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक अर्ध्याने कमी होणार आहे. याशिवाय, पुणे ते बंगळुरू महामार्गालगत इंडस्ट्रियल क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क आणि मोठे उद्योग सुरू झाल्यास या भागाचा आणखी विकास होणार आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या चारपदरी महामार्गामुळे कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. पुढे हा रस्ता कोल्हापूर ते नागपूरशी जोडल्या गेल्याने रत्नागिरी आणि नागपूर प्रवास जलद होणार आहे. या मार्गामुळे परिसराचा आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी आणि पर्यटन वाढण्यास फायदेशीर ठरणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *