नांदणी (जि. कोल्हापूर), दि. २८ जानेवारी – “अखंडता, गुणवत्ता, सद्भावना आणि विश्वसनीयता हे २१ व्या शतकातील सगळ्यात मोठे भांडवल आहे आणि त्यावरच व्यवसायाचे यश अवलंबून असते. पैसा, तंत्रज्ञान मिळवणे सोपे आहे; मात्र लोकांचा विश्वास संपादित करणे आणि टिकून ठेवणे आव्हानात्मक आहे. मान आणि सन्मान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र उत्तम गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या साहाय्याने ती मिळवणे अवघड नाही. चाकोते ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीज आणि त्यांच्या उत्पादनांवर नागरिकांचा विश्वास असल्यामुळेच त्यांच्या उत्पादनाला आज देशातूनच नाही, तर विदेशातूनही मागणी आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नांदणी (जि. कोल्हापूर) येथील चाकोते ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, श्री छत्रपती शाहू महाराज, चाकोते ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री अण्णासाहेब चाकोते, खासदार श्री धनंजय महाडिक, खासदार श्री धैर्यशील माने, खासदार श्री संजय काका पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह चाकोते ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीजचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “एका छोट्याशा गावात बेकरीपासून सुरू झालेल्या चाकोते ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीज आज मल्टिनॅशनल कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. या यशात श्री अण्णासाहेब चाकोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे मराठी माणूस कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, यावरून पुन्हा सिद्ध होते. कुठलाही व्यवसाय एका व्यक्तीमुळे यशस्वी होत नाही, तर त्यामागे टीमवर्क असते. अहंकार, मीपणा व्यवसायासाठी मारक आहे. त्यामुळे यशस्वी उद्योजक होण्यासाठी नम्रता, पारिवारिक भावनेतून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे.”