मुंबई, दि. ६ जानेवारी – “मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि कविता यांचा इतिहास उज्ज्वल आणि गौरवशाली आहे. हे महाराष्ट्रात राहून कधीच कळून येत नाही. तेच जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्याचे मोठेपण समजून येते. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाचे मन, आत्मा मराठीमुळे घडला आहे. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मराठी भाषा, संस्कृतीविषयी त्याच्या मनात असलेले प्रेम, आपुलकी कायम आहे. ‘विश्व मराठी संमेलना’सारख्या उपक्रमांमुळे तो आणखी जागवला जातो,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
मुंबईमधील वरळी येथे आयोजित ‘विश्व मराठी संमेलना’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री श्री दीपकजी केसरकर, उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत, आमदार कॅप्टन श्री तमिळजी सेल्वन, मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषाजी म्हैसकर, श्री संदीपजी दीक्षित, श्री योगेंद्रजी पुराणिक, श्री विजयजी पाटील, डॉ. श्री सुरेशजी चव्हाण, श्री आनंदजी गानू, श्री अभिषेकजी सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “विज्ञान, माहिती तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांत आज मराठी माणूस पुढे गेला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्व आणि मेहनतीने त्याने नाव, पैसा कमावला आहे. भारत ही जगात सर्वांत वेगाने पुढे येणारी अर्थव्यवस्था आहे. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारत बनण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. यात देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय व मराठी माणसाचे मोठे योगदान आहे. या मराठी माणसाने महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्यास येथील उद्योजकता वाढून राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.”
“कृषी, ग्रामीण भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशात आज ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. तेथील थांबलेला विकास, जीवनावश्यक सुविधा आणि रोजगाराच्या संधींचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे देशाचा खऱ्याअर्थाने विकास साध्य करायचा असल्यास सर्वांत आधी ग्रामीण भागाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. येथील नागरिकांचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी येथे गुंतवणूक येण्यासह कृषिक्षेत्रासंबंधी जगातील सर्वोत्तम आधुनिक तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध होण्याची आवश्यता आहे. तेव्हाच विकासाचे हे उद्दिष्ट साध्य होईल.”