नागपूर, दि. ३ जानेवारी – “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यातच आज ‘१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेस’चे येथे आयोजन होत आहे. ही विद्यापीठ आणि नागपूरकरांसाठी गौरवाची बाब आहे. यासारख्या उपक्रमांमुळे ‘न्यू इंडिया’ निर्मितीला बळ मिळणार आहे. तसेच शास्त्रज्ञांनाही शाश्वत विकासासाठी आवश्यक भविष्यवादी तंत्रज्ञान बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथे आयोजित ‘१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेस’चे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहत उद्घाटन केले. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. राज्याचे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंगजी कोश्यारी, केंद्रीय मंत्री श्री डॉ. जितेंद्रजी सिंह, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री डॉ. सुभाषजी चौधरी, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांच्यासह अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “आज देश आत्मनिर्भर भारत आणि ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टेने आपले प्रयत्नदेखील सुरू आहेत. मात्र, आपल्या देशातील ६५ टक्के जनता ही ग्रामीण भागातील आहे. हे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास सर्वांत आधी ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. येथील नागरिकांचे जीवनमान उंचावणे आवश्यक आहे. आज देशाच्या अर्थव्यवस्थेत केवळ १२ ते १४ टक्के वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विज्ञानाचा वापर करून शाश्वत कृषी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. इथिक्स, इकॉनोमी, इकॉलॉजी आणि एनव्हायरमेंट हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधार स्तंभ आहेत. अर्थव्यवस्थेचा विकास करायचे झाल्यास विज्ञानाशिवाय त्याला पर्याय नाही. यासाठी भविष्यातील कृषी तंत्रज्ञान निर्मितीवर भर द्यायला हवा. त्यासाठी योग्य संशोधनाची गरज आहे. तेव्हाच ग्रामीण भाग, गरीब, मजदूर आणि शेतकरी यांचा विकास होऊ शकेल आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल.”