नागपूर, दि. २५ डिसेंबर – “श्री शुभलक्ष्मी क्रेडिट कॉ-ऑप सोसायटीच्या सर्वच संचालक मंडळींच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज ही संस्था नावारूपाला आली आहे. वेळोवेळी ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी वैयक्तिक हित आड न येऊ देता केवळ संस्थेच्या विकासाचाच विचार केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे संस्थेने आज नाव आणि प्रॉफिट दोन्हीही कमावले. हे त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील श्री शुभलक्ष्मी क्रेडिट कॉ-ऑप सोसायटीच्या इमारत नूतनीकरण आणि लॉकर सुविधा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार श्री कृष्णा खोपडे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष व नागपूर सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री संजय भेंडे, श्री काकासाहेब कोपटे, श्री बटुकभाई बागडीया, श्री गोरावजी जाजू, श्री राजेंद्र कापसे यासहसंस्थेचे संचालक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “आज पार्डीसह पूर्व नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. त्याचसोबत येथे मोठे उद्योग आल्याने तरुणांसाठी रोजगाराची दारेदेखील खुली झाली आहे. सिंबायोसिससोबतच नर्सी मोंजे कॉलेजची शाखादेखील येथे सुरू होत असल्याने शिक्षणाच्या चांगल्या सुविधाही निर्माण होत आहेत. याशिवाय, आता लवकरच अंबाझरी तलाव ते पार्डी असा बोटीतून प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पासाठी जयकाच्या मदतीने २४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पांमुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.”
“पार्डीसाठी १०० कोटी रुपये खर्च करून नवीन भाजी मार्केटची इमारत तयार करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन येत्या तीन महिन्यात होऊन ती लवकरच नागरिकांच्या सेवेत येईल. यामुळे भाजीसह इतर बाजार एका छताखाली येणार असून यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. ही भव्य इमारत नक्कीच पार्डीच्या वैभवात भर घालेल. याशिवाय, २४ तास वीज आणि पाणी, चांगले रस्ते, सर्वांना पक्के घरे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत,” असे गडकरीजी यांनी सांगितले.