नागपूर, दि. २५ डिसेंबर – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी नागपूरमधील सावरकर नगरमधील जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि. २५ डिसेंबर) ‘जनसंपर्क’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. या वेळी नागपूरकरांसह महाराष्ट्रातील अन्य भागांतून ही नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आले होते.
जनसंपर्क कार्यालयात समस्यांची निवेदने घेऊन वयोवृद्ध, महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध प्रवर्गातील नागरिक सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयात येताच श्री गडकरीजी यांनी कार्यालयाबाहेर मंडपात थांबलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची प्राधान्याने भेट घेतली व त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित इतर नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना समस्येबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. स्थानिक व राज्यस्तरावरील प्रश्न, केंद्र सरकार संबंधित विषय, रोजगार, अनुकंपा, आरोग्य, भरपाई, अनुदान, रस्तेबांधणी, राष्ट्रीय महामार्गाचे काम यासह अनेक विषयांची निवेदने घेऊन नागरिक आले होते. या वेळी आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या समस्यांचे समाधान केले. दरम्यान, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश श्री गडकरीजी यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.
लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत
मा. गडकरीजी यांनी उबेदूर रहमान आणि योगिता निशद या दोन लहान मुलांच्या बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी मदत दिली होती. या वेळी या मुलांच्या पालकांनी मा. गडकरीजी यांची भेट घेऊन आभार मानले. तसेच महाविद्यालयीन युवकाने तयार केलेल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सायकलचे प्रात्यक्षिक मा. गडकरीजी यांनी पाहिले आणि त्या युवकाच्या नवनिर्मितीचे कौतुकही केले. या वेळी समस्या घेऊन आलेल्या कलावंत, उद्योग-व्यवसाय, संशोधन अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तींचे समाधान केले.