८ ते २२ जानेवारीदरम्यान रंगणार खासदार क्रीडा महोत्सव
१५ दिवस ५६,००० खेळाडू ६२ मैदानांवर ५४ प्रकारचे खेळ
नागपूर, दि. २४ डिसेंबर – “चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणे, व्यासपीठ मिळवून देणे आणि खेळाप्रती आवड निर्माण करणे, हाच खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवातून तयार होणारे खेळाडू ऑलम्पिकपर्यंत जाऊन राज्यासह देशाचे नाव पुढे नेतील,” असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री श्री गडकरीजी यांच्या प्रेरणेतून नागपुरात ८ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीदरम्यान होणाऱ्या ‘खासदार (संसदीय) क्रीडा महोत्सवाचा ध्वज वितरण समारंभ’ शनिवारी (दि. २४ डिसेंबर) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. यावेळी पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मभूषण श्री देवेंद्रजी झंझारिया, कुस्तीपटू संगीता फोगाट, अभिनेता श्री. अनूपसिंह ठाकुर, आमदार श्री प्रवीणजी दटके, आमदार श्री कृष्णा खोपडे, आमदार श्री टेकचंदजी सावरकर, माजी खासदार पद्मश्री विकासजी महात्मे, श्री मिलींद माने, श्री सुधीर दिवे, श्री नागो गाणार, महोत्सवाचे संयोजक श्री संदीप जोशी यांची उपस्थिती होती.
खासदार क्रीडा महोत्सवात १५ दिवस ५६,००० खेळाडू शहरातील ६२ मैदानांवर ५४ प्रकारचे खेळ आणि १२,०२० सामने खेळणार आहेत. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. शाळा आणि क्रीडा मंडळांसाठी १९ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी श्री गडकरीजी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री गडकरीजी म्हणाले, “केवळ रस्ते, टनेल बनवून फायदा नाही. यासोबत सांस्कृतिक, क्रीडा महोत्सवांचे आयोजन करण्याचीही आज गरज आहे. यामुळे नवं कलाकारांसह खेळाडूंना प्रोत्साहन मिळून देशाचे नाव पुढे जाईल. खासदार महोत्सव यापूर्वी झाला नाही, तेवढा यंदा छान आणि मोठा होईल, असे खेळाडूंचा उत्साह बघून वाटत आहे. आज युवापिढी मोबाईलमध्ये अडकून पडल्याने मैदानी खेळांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. मात्र आपल्याला सशक्त भारत निर्माण करायचा असल्यास त्यांच्यामध्ये खेळाप्रती आवड निर्माण करायला हवी, यानेच भविष्यातील भारत बनेल.”
“यंदा महोत्सवात सहभागी होणाऱ्या ५६,००० खेळाडूंचा २ लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान मृत्यू झाल्यास वारसास १०० टक्के म्हणजेच २ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. याशिवाय, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १०० टक्के म्हणजेच २ लाख रुपये, ५० टक्के अपंगत्व आल्यास ५० टक्के रक्कम म्हणजेच १ लाख रुपये मिळणार आहे.”