शिक्षणावरील खर्च म्हणजे चांगला माणूस बनण्याची इन्व्हेस्टमेंटच – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २४ डिसेंबर – “कोणतीही व्यक्ती उपजतच परफेक्ट नसते. व्यक्तीला खऱ्या अर्थाने घडवण्याचे काम शिक्षण करते. याचसोबत त्याला योग्य मार्गदर्शनाचीही आवश्यकता असते. नुसतेच शिक्षण घेऊनही उपयोग नाही, माणसाचे माणूसपण आणि त्याचे संस्कार शिक्षणातून ग्रहण करणे देखील तेवढेच आवश्यक आहे. तेव्हाच उद्याचा चांगला नागरिक निर्माण होईल,” असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.

उमरेड (नागपूर) येथील श्री संत गुलाबबाबा शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्या वाचस्पती शिवयोगी परम पूजनीय डॉ. दत्ताजी महाराज, आमदार श्री राजूभाऊ पारवे, माजी आमदार श्री सुधीरजी पारवे, श्री अरविंदजी गजभिये, श्री आनंदरावजी राऊत, संस्थेचे अध्यक्ष श्री रामजी भाकरे, सचिव विजयालक्ष्मी भदोरिया यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “आज सर्वांनाच डॉक्टर, इंजिनियर बनायचे आहे. मात्र, असे न करता आपल्यातील सुप्त गुण ओळखा. कोणत्या क्षेत्राची आवड आहे हे ओळखून त्या दृष्टीने वाटचाल करा, तेव्हाच जीवनात यशस्वी होता येते. केवळ घोकंपट्टी न करता समजून उमजून केलेली गोष्ट आयुष्यात फायदेशीर ठरते. शिक्षणावर होणारा खर्च म्हणजे चांगला माणूस निर्माण करण्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट असते. ती कधीही निरुपयोगी ठरत नाही; मात्र याची जाणीव असायला हवी. आयुष्यात एक ध्येय निश्चित करा. ते प्राप्त करत असताना कितीही अडथळे आले तरी न डगमगता प्रयत्न करत राहा. आत्मविश्वास, इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट साध्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *