नागपूर, दि. २४ डिसेंबर – “देशात प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी सर्वांत आधी देशातून पेट्रोल-डीझेल हद्दपार होणे आवश्यक आहे. याशिवाय, पर्यावरणपूरक इंधन म्हणजेच ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, फ्लेक्स इंजिन आणि ई-वाहन वापराला प्रोत्साहन मिळाल्यास ही समस्या सुटण्यास मदत होऊ शकते,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्ही.एन.आय.टी.) द्वारे आयोजित हीरक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रमोदजी पडोळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “देशात प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली सर्वांत वर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील भागात परली (राईस स्ट्रॉ) जाळण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, या परली (राईस स्ट्रॉ)चा वापर इथेनॉल व बायो बिट्यूमिन तयार करण्यासाठी झाल्यास पेट्रोल-डीझेलला ते पर्याय ठरू शकते. सध्या १७ लाख करोड रुपये पेट्रोल-डीझेल आयातीवर होतो. हा खर्च देखील काही प्रमाणात कमी होऊ शकेल. इंडियन ऑइलकडून सोनीपथ येथे १ लाख टन परलीपासून १ लाख लिटर इथेनॉल आणि १५० टन बायो बिट्यूमिन तयार करण्यात येत आहे. यासाठी देशात आवश्यकता आणि प्रदेशानुसार संशोधन होण्याची आवश्यकता आहे. याची जबाबदारी भावी अभियंत्यांवर आहे. नवनवीन तंत्रज्ञानावर संशोधन झाल्यास सर्व समस्या सुटण्यासह आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेलाही बळ मिळेल.”
“देशाच्या अर्थव्यवस्थेत २२ ते २४ टक्के उत्पादन क्षेत्र, ५२ ते ५४ टक्के सेवा क्षेत्र, १२ ते १४ टक्के वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. देशातील ६० टक्के जनता ग्रामीण भागातील आहे. मात्र, आज ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. येथील जनतेला गावातच रोजगार, चांगल्या आरोग्य, शिक्षण तसेच इतर जीवनावश्यक सुविधा मिळाल्यास त्यांना असे करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय, कृषी आधारित संशोधन झाल्यास शेती उत्पादन वाढण्यासोबतच पर्यायी व्यवसाय उपलब्ध होऊन अन्नदाता शेतकरी सुखी, समृद्ध होण्यास मदत होईल.”