द्वारका सर्कल ते नाशिक रोड मेट्रो मार्गावर नागपूरच्या धर्तीवर डबल डेकर उड्डाणपूल
इगतपुरी (जि. नाशिक), दि. १८ डिसेंबर – “उद्योग, दळणवळण आणि व्यापाराच्या दृष्टीने नाशिक जिल्हा हा महत्त्वाचा आहे. तसेच मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग, सुरत ते चेन्नई राष्ट्रीय महामार्ग आणि ड्रायपोर्टसह आदी महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे येथील विकास आणखी झपाट्याने होणार आहे. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यांमुळे नाशिक इम्पोर्ट-एक्सपोर्ट हब होणार आहे,” असा विश्वास मा. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला. याशिवाय, नाशिक मेट्रो मार्गावरील द्वारका सर्कल ते नाशिक रोड या सहा किलोमीटर अंतरावर नागपूरच्या धर्तीवर डबल डेकर उड्डाणपुलाची घोषणा यावेळी त्यांनी केली.
इगतपुरी (जि. नाशिक) येथील १८०० कोटी रुपये किंमतीच्या आणि २२६ किमी लांबीच्या ८ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन दि. १८ डिसेंबर रोजी मा. श्री गडकरीजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारतीजी पवार, खासदार श्री डॉ. सुभाषजी भामरे, माजी केंद्रीय मंत्री व खासदार श्री हेमंतजी गोडसे, आमदार श्री हिरामणजी खोस्कर, आमदार श्री ॲड. माणिकरावजी कोकाटे, आमदार श्री मोहम्मदजी खलिक, आमदार डॉ. राहुलजी अहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “नाशिक रोड ते द्वारका चौक हा एलिव्हेटेड कॉरिडॉर भारतमाला परियोजनेतून विकसित करण्यात येणार आहे. या मार्गावर मिट्रो धावणार असून या प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळणार आहे. २१०० कोटी खर्चाच्या या प्रकल्पात दोन मार्गांचा समावेश असून पहिला गंगापूर रोड ते नाशिक रोड २० किलोमीटर आणि दुसरा गंगापूर रोड ते मुंबई नाका १० किलोमीटरचा असणार आहे. याशिवाय, या मेट्रो मार्गावर द्वारका सर्कल ते नाशिक रोड या सहा किलोमीटरच्या अंतरात डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. हा डबल डेकर उड्डाणपूल त्रिस्तरीय संरचनेचा असणार आहे. यात जमिनीवर चार लेन रस्ता, त्यावर चार लेन रस्ता असलेला उड्डाणपूल आणि त्यावरील बाजूस मेट्रो धावणार आहे. १६०० कोटी रुपये खर्चाच्या या डबल डेकर उड्डाणपुलामुळे नाशिक रोड ते द्वारका चौक असा प्रवास वेगाने पूर्ण करता येणार असून वाहतूक कोंडी सुटण्यासह अपघातातही घट होणार आहे.”
“नाशिक जिल्ह्यासाठी सुरत ते चेन्नई हा महामार्ग वरदान ठरणार आहे. ८० हजार कोटी रुपये खर्चाच्या या ग्रीन हायवेचे नाशिक जिल्ह्यात १० हजार कोटींचे काम होणार आहे. हा महामार्ग सुरत, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर यानंतर पुढे दक्षिण भारतात जाणार असल्याने उद्योग, व्यापार आणि कृषी मालाच्या वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूर अंतर ४ तासांवरून दीड ते पावणे दोन तासांवर येणार आहे. याशिवाय, हा महामार्ग ग्रामीण, आदिवासी भागांतून जाणार असल्याने रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत,” असेही मा. श्री गडकरीजी म्हणाले.
याशिवाय, नाशिक ते मुंबई या सहा पदरी महामार्गाचे काँक्रीटीकरण, इंदिरा सागर बोगदा रुंदीकरण आणि सर्व्हिस रोडचे काम करणे तसेच राणेनगर येथील बोगद्याचे अंतर वाढवण्याच्या मागणीला यावेळी मा. श्री गडकरीजी यांनी मंजुरी दिली आहे.