नागपूर, ११ डिसेंबर – “खासदार, आमदार म्हणून केवळ नदी, नाले आणि रस्ते एवढेच काम ठरवून न घेता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. याशिवाय, जात, धर्म आणि लिंग न पाहता कलाकाराला त्याच्यातील कलागुणांनुसार संधी मिळायला हवी. हाच खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
गायन, वादन, नृत्य, नाटक आणि काव्य अशा अनेकविध कलांचा संगम असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’चा समारोप दि. ११ डिसेंबर रोजी झाला.
यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. नागपूर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात हा महोत्सव पार पडला.
श्री गडकरीजी म्हणाले, “यंदाच्या महोत्सवात स्थानिक ५ हजार कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. तसेच, प्रत्येकाच्या कलेला प्रोच्छाहन मिळावे म्हणून समाजाकडून कायमच दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी बांधवांनाही यंदा संधी देण्यात आली होती. नागपूरकरांकडूनही महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देत स्थानिकसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांचा उत्साह वाढवला.”
‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’कडून वर्षभर घेतलेल्या विविध कार्यक्रमांतून दिव्यांगांना ४० हजार कोटींचे साहित्य वाटप करण्यात आल्याचे यावेळी श्री गडकरीजी म्हणाले. याशिवाय, ‘एनआयटी’च्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिव्यांग पार्कचे भूमिपूजनही लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.