डबल डेकर व्हाया-डक्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
नागपूर, ४ डिसेंबर – ‘एनएचएआय’ आणि नागपूर महा-मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्धा रोड येथील डबल डेकर व्हाया-डक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. जगभरातील मेट्रो श्रेणीतील सर्वांत लांब डबल डेकर वाया-डक्ट म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. या संबंधीचे प्रमाणपत्र महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेशजी दीक्षित यांनी रविवारी (दि.४ डिसेंबर) केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी श्री गडकरीजी यांनी ‘एनएचएआय’ आणि नागपूर महा-मेट्रो टीमचे अभिनंदन करत कौतुक केले.
श्री गडकरीजी यांच्या संकल्पनेतून हे व्हाया-डक्ट साकारण्यात आले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अजुडिकेटर श्री ऋषी नाथ यांनी डॉ. दीक्षित यांना नुकतेच प्रमाणपत्र प्रदान केले होते. या ३.१४ कि.मी. लांबीच्या डबल डेकर व्हाया-डक्टला आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यापूर्वी मानांकन मिळाले आहे. आशिया खंडातील सर्वांत लांब डबल डेकर व्हाया-डक्ट असल्याची मान्यता यापूर्वी महामेट्रोला या दोन संस्थांकडून मिळाली आहे.
डबल डेकर व्हाया-डक्टवर बांधलेल्या सर्वांत जास्त मेट्रो स्टेशनसाठीही आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून महा-मेट्रोला मानांकन मिळाले आहे.
या रेकॉर्डसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री गडकरीजी यांनी डॉ. दीक्षित यांचा सत्कार केला होता.
वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्ट हा ३-स्तरीय संरचनेचा आहे. ज्याच्या वरील बाजूस मेट्रो रेल्वे, मध्यम स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि जमिनीच्या पातळीवर विद्यमान रस्ता आहे. ३.१४ कि.मी. लांबीचा हा डबल डेकर व्हायाडक्ट ही जगातील कोणत्याही मेट्रो रेल्वे प्रणालीतील सर्वांत लांब संरचना असल्याचे महा-मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मार्च २०१७ साली महा-मेट्रोने ‘कामाच्या ठिकाणी सुरक्षा’ (सेफ्टी ऍट वर्क) संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांत मोठी मानवी साखळीचे आयोजन केले होते. या विक्रमाचीदेखील आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या मानवी साखळीत कामगार, पर्यवेक्षक, व्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. महा-मेट्रोने अनेक स्तरांवर आणि व्यासपीठावर आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत.