नागपूर, ३ डिसेंबर- “नावीन्य, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन ही यशाची गुरुकिल्ली आहे. तसेच, नवनवीन तंत्रज्ञान हे देशाचे भविष्य आहे. या ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत झाल्यास देशाचे भविष्य उज्वल आहे. सुयोग्य नेतृत्व, तंत्रज्ञान यांच्या आधारे आपण निरुपयोगी गोष्टींनाही समृद्धीत परावर्तित करू शकतो. भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे सामर्थ्य तंत्रज्ञानात आहे. यासाठी आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवणे आवश्यक आहे. याला बळ देणारे क्षेत्र म्हणजे तंत्रज्ञान,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीन जी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील सेंट विन्सेंट पलोटी कॉलेजद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमरायाजी मैत्री, एससीएलच्या उपाध्यक्ष अंबिका नटराजन, प्राचार्य सुरेंद्र गोले, प्रा. आर. बी. गोवर्धन, मनोज ब्रह्मे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञानाचा उपयोग करून आपण देशाचे भविष्य घडवू शकतो. आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी, उत्पादन आणि सेवाक्षेत्राचा मोठा वाटा आहे. आपल्या देशातील ५२ टक्के जनसंख्या ग्रामीण भागातील आणि कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळे कृषी, ग्रामीण क्षेत्रात संशोधन होऊन नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होणे आवश्यक आहे. यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होऊन गरिबी कमी होईल.”
“ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचे जीवन समृद्ध होण्यासाठी त्यांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संशोधन होते. मात्र, तेच गरजांनुसार झाले तर त्याचा अधिक फायदा होऊ शकेल. महाराष्ट्र आणि विदर्भातील ८० टक्के भाग हा जंगलाने वेढलेला आहे. नागपूर ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखली जाते. तसेच विदर्भात वाघांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. हा भाग पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झाल्यास स्थानिकांच्या रोजगाराचाही प्रश्न सुटू शकेल.”
“देशाच्या विकासासाठी पाणी, वाहतूक, संवाद आणि शक्ती या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याशिवाय उद्योग वाढणार नाही. उद्योगांशिवाय रोजगार निर्माण होणार नाही आणि भांडवली गुंतवणूकदेखील होणार नाही. रोजगार निर्माण न झाल्यास गरिबी हटणार नाही. त्यामळे विविध तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. त्याशिवाय देश समृद्ध होऊ शकणार नाही.”